scorecardresearch

Russia Ukraine War : भारतीय विद्यार्थी भयग्रस्त ; मायभूमीत येण्यासाठी व्याकूळ

या युद्धामुळे अद्याप संपर्कयंत्रणा उद्ध्वस्त झालेली नाहीये, एवढाच येथील विद्यार्थ्यांना दिलासा आहे

युक्रेनमधील शेकडो भारतीय विद्यार्थी गुरुवारी मायदेशी परतले.

कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले असून अद्यापही त्यांचा भारतीय दूतावसाशी संपर्क होऊ शकत नाही. येथील सुमी शहरातील सुमी विद्यापीठातील काही विद्यार्थानी द इंडियन एक्सप्रेसह्णशी संवाद साधून आपली व्यथा व्यक्त केली.

मूळ थ्रिसूरचा (केरळ) येथील विद्यार्थिनी निरंजना संतोषने सांगितले, की कुठल्याही भारतीय अधिकाऱ्यानी तिला किंवा तिच्या मैत्रिणींना संपर्क साधलेला नाही. भारतीय दूतावासातर्फे कुणीही अद्याप त्यांना दूरध्वनीवरून प्रतिसाद दिलेला नाही. ती म्हणाली, ह्णफेसबुक पेजवर नमूद फोन क्रमांक यादीनुसार अनेक क्रमांकांवर आम्ही वारंवार संपर्क साधला पण कोणताही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. येथे गेल्या आठवडाभरापासून बॉंब वर्षांव होत आहे. आम्हाला बाहेरही पडता येत नाहीये. आम्ही मोठय़ा भयग्रस्त आणि शॉकमध्ये आहोत. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत घरी जायचे आहे.

हरियाणाच्या पानिपत येथील २० वर्षीय श्रुती त्यागी हिने सांगितले, की धोक्याची घंटा (सायरन) वाजू लागली की दिवसातून किमान तीनदा आम्ही आमच्या वसतिगृहाच्या तळमजल्यातील तळघरांत (बंकर) लपतो. इथे कुठेही शांतता नाहीये. आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकून गेलो आहोत.

या युद्धामुळे अद्याप संपर्कयंत्रणा उद्ध्वस्त झालेली नाहीये, एवढाच येथील विद्यार्थ्यांना दिलासा आहे. केरळच्या कोल्लम येथील विद्यार्थिनी आर. मनिषा हिने सांगितले, की आम्ही स्वत:ला कशात तरी गुंतवून घेत आहोत. परंतु मायदेशात आमचे आई-वडील, इतर नातलग प्रचंड चिंतेत आहेत.

सुमी येथील रहिवासी असलेली वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षांत शिकणारम्या मारिया डुमासिया हिने सांगितले, की आठवडय़ाभरापासून त्यांनी विद्यापीठ परिसर सोडलेला नाहीये. युक्रेनमधील कुसुम फार्मास्युटिकल्स कंपनीने पाठवलेले स्वयंसेवक आमच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत. ते आम्हाला अन्न आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवत आहेत. सुमी येथे दहा वर्षांपासू राहणारा या कंपनीचा कर्मचारी विकास जावळेने सांगितले, की सुमी शहरात सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.  ते विद्यापीठाच्या वसतिगृहांत रहात असून, खूप घाबरलेले आहेत. आम्ही त्यांच्याशी संवाद साधत असून, आम्ही रशियाच्या भागाकडून त्यांचे स्थलांतर करून त्यांची सुटका करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आम्ही युक्रेनच्या इशान्य भागात असून, हा भाग रशियाच्या सीमारेषेजवळ आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ukraine war indian students hurry to flee ukraine zws