शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या आपल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पण या निर्णयासंबंधी दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिकांवर २२ जानेवारी रोजी खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. २८ सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या सर्व फेरविचार याचिका दाखल झाल्या आहेत.

फेरविचार याचिकांसह सर्व प्रलंबित अर्जांवर २२ जानेवारी २०१९ रोजी खुल्या न्यायालयात सुनावणी होईल असे सर्वोच्च न्यायालायने सांगितले. २८ सप्टेंबरचा आमचा आदेश आम्ही स्थगित केलेला नाही असेही सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयावर पूनर्विचार करावा यासाठी तब्बल ४८ याचिका दाखल झाल्या आहेत.

२८ सप्टेंबरला माजी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने ४ विरुद्ध १ अशा फरकाने शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले करण्याचा निकाल दिला. या निर्णयाविरोधात ९ ऑक्टोंबरला दाखल झालेल्या फेरविचार याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.

शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले करण्याच्या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. शबरीमाला मंदिर परिसरात भक्तांची जोरदार आंदोलने सुरु आहेत. अनेक महिलांना पोलीस संरक्षण घेऊनही मंदिरात प्रवेश करता आलेला नाही. केरळमध्ये हा एक मोठा राजकीय मुद्दा बनला आहे.