समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांचे पॅरिस हल्ल्यासंदर्भातील वक्तव्य दहशतवादाचे समर्थन करणारे असल्याची टीका भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. टिपू सुलतान किंवा पॅरिस हल्ल्यासंदर्भातील आझम खान यांची वक्तव्ये पाहिली असता आझम खान यांचा दहशतवादाला पाठिंबा असल्याचे प्रतीत होते. पॅरिस हल्ला ही एक ‘प्रतिक्रिया’ असल्याचे ते म्हणतात. मला कधीकधी असे वाटते की, आझम खान यांचा एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंध असावा. इतकेच नाही तर अल-कायदा आझम खान यांच्या सांगण्यावरूनच हिट-लिस्ट तयार करत असावी, अशी टीकाही साक्षी महाराज यांनी केली.

आझम खान यांनी सोमवारी विशिष्ट कारणांमुळे पॅरिसवर हल्ला करण्यात आल्याचे सांगत यासाठी पश्चिमी देशांच्या भूतकाळातील कृत्यांना जबाबदार धरले होते. आम्ही ज्याप्रमाणे पॅरिसवरील हल्ल्याचा निषेध करतो, त्याचप्रमाणे अमेरिका आणि रशियाकडून आखाती देशांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचाही निषेध करतो. इराक, अफगाणिस्तान, लिबिया, सिरिया आणि इराण हे देश या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाले. निष्पापांना सर्वप्रथम कुणी मारले आणि कोण प्रतिकार करत आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करत असाल तर त्याच्या विपरीत परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे. अमेरिका, रशिया वा अन्य कोणीही असो निष्पापांना मारणे चुकीचे आहे. कोण दहशतवादी आहे आणि कोण नाही, याचा न्याय इतिहासच करेल, असे मत आझम खान यांनी मांडले होते.