पाकिस्तानातील कारागृहात करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्या पार्थिवावर शुक्रवारी भिखिविंड या त्याच्या जन्मगावी संपूर्ण शासकीय इतमामाने अन्त्यसंस्कार करण्यात आले. पंजाब पोलिसांच्या सशस्त्र दलाने हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून सरबजित सिंग याला अखेरची मानवंदना दिली. सरबजित सिंग याची बहीण दलबीर कौर यांनी सरबजित सिंग याच्या चितेला अग्नी दिला तेव्हा सरबजित सिंग याची पत्नी सुखप्रीत कौर, कन्या स्वप्नदीप आणि पूनम कौर, जावई संजय आणि हजारो शोकाकुल ग्रामस्थ उपस्थित होते. दलबीर कौर यांनी सरबजित सिंगच्या चितेला अग्नी देताच त्याचे कुटुंबीय आणि हजारो ग्रामस्थांना शोक अनावर झाला. ‘सरबजित अमर रहे’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, अशा घोषणा या वेळी ग्रामस्थांनी दिल्या.
तिरंग्यात लपेटलेला सरबजित सिंगचा मृतदेह येथील शासकीय शाळेच्या मैदानात अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री प्रीनीत कौर आणि अनेक नेते या वेळी उपस्थित होते. बादल यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. इतकेच नव्हे तर सरबजित सिंग याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली असून त्याच्या मुलींना शासकीय सेवेत नोकरी देण्यात येणार असल्याचे बादल यांनी जाहीर केले.
सरबजित सिंगच्या चितेला अग्नी देण्यापूर्वी मंत्रोच्चारांचे पठण करण्यात आले. सरबजित सिंग याचे अखेरचे दर्शन व्हावे या हेतूने नजीकच असलेल्या इमारतींच्या गच्चीवरही नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा, राजकुमार वेरका, कमल शर्मा या नेत्यांबरोबरच विविध राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
सरबजित सिंग याचे पार्थिव अन्त्यसंस्कारासाठी आणताच त्याच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला. त्या वेळी ग्रामस्थांनी त्यांचे सांत्वन केले. दु:खाने व्याकूळ झालेल्या त्याच्या मुलींना या वेळी भोवळ आली तेव्हा अनेक ग्रामस्थांनी त्यांना सावरले. ‘सरबजित अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती अन्त्यसंस्कारासाठी हजर राहणार असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरणतारण येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.
सरबजित सिंगचे पार्थिव संपूर्ण गावात नेण्यात आले, त्यानंतर शासकीय शाळेच्या मैदानापासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे लागली. सरबजित सिंग याच्या मृत्यूची बातमी येऊन थडकल्यापासून जवळपास ११ हजार वस्ती असलेल्या गावावर गुरुवारपासूनच शोककळा पसरली होती. दुकाने, व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली होती. संतप्त ग्रामस्थांनी काही ठिकाणी उग्र निदर्शने केली आणि पाकिस्तानविरोधी घोषणा देऊन प्रतिमाही जाळली.
सरबजित सिंगच्या मृत्यूचे निश्चित कारण कळण्यासाठी अमृतसरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पहिले शवविच्छेदन लाहोरमधील रुग्णालयात करण्यात आले होते. सरबजित सिंगच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या बाबींची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.