रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर आज नवी दिल्लीत सह्या झाल्या आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियन व हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी सांगितले असून सविस्तर बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

सौदी अरेबियाच्या खनिज तेलासाठी भारत हा मोठा ग्राहक असून भविष्यातील धोरणात्मक गुंतवणूक म्हणून सौदी अरेबिया या व्यवहाराकडे बघत आहे. सध्या तेलाचे भाव प्रति पिंप 70 डॉलरच्या आसपास असून असे चढे दर भारतासाठी धक्कादायक आहेत. त्यामुळे जगातल्या भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत टिकण्यासाठी सौदी अरेबिया 30 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये रस घेत असल्याचे चित्र आहे.

भारताच्या पश्चिम किनारी असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील तसेच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असे सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल असे मत प्रधान यांनी व्यक्त केले आहे. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौदी अरमाकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासेर या करारासाठी भारतात आले आहेत. भारत आपल्या गरजेपैकी 80 टक्के खनिज तेल आयात करतो. एकाच पुरवठादारावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या उत्पादकांकडून तेल घेणे हे भारताचे धोरण राहिलेले आहे.