पोर्तुगालमधील न्यायालयाने प्रत्यार्पण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजा ठोठावणाऱया कुख्यात अबू सालेमला सोमवारी दिलासा मिळाला नाही. अबू सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पोर्तुगालमधील न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेवर बंधनकारक नाही, असे निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले.
पोर्तुगाल सरकारने अबू सालेमचे भारताकडे करण्यात आलेले प्रत्यार्पण रद्द करण्याचा निर्णय़ दिला आहे. त्यानंतर आपल्यावरील सर्व कायदेशीर कारवाई रद्द करून आपल्याला पुन्हा पोर्तुगालमध्ये पाठविण्याची मागणी सालेमने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने सालेमचे प्रत्यार्पण अजूनही वैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. सालेमवर टाडा आणि अवैधरित्या स्फोटके बाळगणे या दोन्ही कलमांखाली दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यास न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली.
अबू सालेम याच्यावर काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहात गोळीबार करण्यात आला होता. देवेंद्र जगताप या कच्च्या कैद्याने केलेल्या या हल्ल्यात गोळी सालेमच्या उजव्या हाताच्या करंगळीला चाटून गेली.