सोमनाथ मंदिरातील रजिस्ट्रारमध्ये राहुल गांधी यांची अहिंदू म्हणून नोंद झाल्यानंतर सुरू असलेल्या राजकीय वादात आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपने त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा प्रतिवाद करताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी हे केवळ हिंदू नसून ते जानवेधारी हिंदू आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसे यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टीकेची तोफ डागली. ते शनिवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा ‘सेक्युलरिझम’ आणि भाजपचा आणि ‘सबका साथ,सबका विकास’ या गोष्टी थोतांड असल्याचे म्हटले.

देशातील लोकांनी आपली ओळख मी जानवेधारी हिंदू आहे, मी हिंदू ओबीसी किंवा हिंदू जैन आहे, अशी सांगावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची मुहूर्तमेढ रोवली होती का? स्वातंत्र्य सैनिकांनी यासाठीच त्याग केला होता का, असा सवाल यावेळी ओवेसी यांनी विचारला. भाजप आणि काँग्रेस यामधून दलित आणि आदिवासी समाजाला कोणता संदेश देऊ पाहत आहे? आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, हे भाजप आणि काँग्रेसला सांगायचे आहे. त्यामुळे काँग्रेसचा ‘सेक्युलरिझम’ आणि भाजपचा आणि ‘सबका साथ,सबका विकास’ या भूमिका पूर्णपणे खोट्या आहेत. ही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.

अमित शहा जैन असूनही स्वतःला हिंदू म्हणवून घेतात, काँग्रेसची खोचक टीका