सिकंदराबाद येथील एका इराणी हॉटेलची ५० वष्रे जुनी इमारत कोसळून सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात किमान १२ जण ठार झाले आहेत़, तर १८ जण जखमी झाले आहेत,  अशी माहिती येथील पोलीस सूत्रांनी दिली़ सिकंदराबादमधील आरपी मार्गावरच्या ‘हॉटेल सिटी लाइट अ‍ॅण्ड बेकरी’च्या दुमजली इमारतीचे छत पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल़े  त्यामुळे ढिगाऱ्याखाली चिरडून सुमारे बारा जणांचा बळी गेला़  अजूनही ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता हैदराद्राबादचे पोलीस आयुक्त अनुराग शर्मा यांनी वर्तवली आह़े  
अडकलेल्यांमध्ये हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबतच तेथे चहा-नाश्त्यासाठी आलेल्या ग्राहकांचाही समावेश असल्याचेही सूत्रांनी सांगितल़े  जखमींना येथील गांधी रुग्णालयात हलविण्यात आले आह़े
स्थानिक पोलीस, हैदराबाद महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी बचावकार्य करीत आहेत़  मलबा उपसणे आणि त्याखाली दबलेल्यांची तातडीने सुटका करणे याला प्राधान्य देण्यात येत आह़े  अडकलेल्यांना सोडविण्यासाठी तज्ज्ञांचे साहाय्य घेण्यात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितल़े
रमजानच्या महिन्यामध्ये हालिम नावाचा गोड पदार्थ बनविण्यासाठी या इमारतीच्या गच्चीवर मोठय़ा भट्टय़या लावण्यात येत असत, त्याही या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचा शर्मा यांचा अंदाज आहे. परंतु यामागचे खरे कारण पूर्ण चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितल़े  दरम्यान महाकाली पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आह़े
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, सकाळी इमारत अचानक खाली येऊ लागली़  कोसळणाऱ्या इमारतीचा आणि त्यात अडकलेल्या लोकांच्या किंकाळ्यांचा आवाज येऊ लागला़ आणि काही कळायच्या आतच इमारतीचा ढिगारा झाला़
या भागातील अनेक जुन्या इमारती जीर्ण आणि मोडकळीस आल्या आहेत़  त्यांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत;  परंतु ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, अशी माहिती हैदराबाद महापालिकेचे आयुक्त एम़ टी़ कृष्णाबाबू यांनी दिली़ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एऩ  किरण कुमार रेड्डी, मंत्री दनम नागेन्दर, गीता रेड्डी आणि मुकेश गौड यांनी घटनास्थळ आणि गांधी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहाणी केली़