सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून ओदिशा पोलिसांनी पॉस्को प्रतिरोध संग्राम समितीच्या नेत्या अभया साहू आणि अन्य तीन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पॉस्कोविरोधी निदर्शकांनी तीन दिवसांपूर्वी अर्धनग्न अवस्थेत येथे निदर्शने केली होती.
सदर महिलांविरुद्ध अभयचंदपूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई केली जाईल, असे जगतसिंगपूरचे पोलीस अधीक्षक सत्यव्रत भोई यांनी सांगितले. दरम्यान, पॉस्को प्रकल्पाच्या समर्थक आणि विरोधक महिलांनी आपापली रणनीती ठरविण्यासाठी स्वतंत्रपणे बैठकांचे आयोजन केले आहे. सदर प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलण्याचे पॉस्को प्रतिरोध संग्राम समितीने ठरविले आहे. आमच्या सुपीक जमिनीवर प्रकल्प न होऊ देण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्याचे ठरविले आहे, असे दुर्गा वाहिनीच्या प्रमुख मनोरमा खटुआ यांनी सांगितले.प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या महिलांनी आपल्या बैठकीत, अर्धनग्न अवस्थेत निदर्शने करणाऱ्या महिलांचा निषेध केला. निष्पाप महिलांना सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न व्हावयास भरीस पाडल्याबद्दल अभया साहू यांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.