पोलिसांकडून सात संशयितांचा शोध जारी
जर्मनीत नववर्षांच्या पूर्वसंध्येला म्युनिक येथे आयसिसच्या वतीने हल्ल्याचा कट रचणाऱ्या सात संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. सात जणांचा शोध घेण्यासाठी किमान साडेपाचशे पोलीस अधिकारी काम करीत आहेत. अमेरिका, फ्रान्स तसेच फ्रेंडली इंटेलिजन्स सव्र्हिस यांनी या हल्ल्याबाबत इशारा दिला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की दक्षिण जर्मनीतील या मध्यरात्रीपूर्वी शहरात हल्ले होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था होती. युरोपमधील सर्वच देशांच्या राजधान्यांना अति सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. पॅरिसमधील नोव्हेंबरच्या हल्ल्यात १३० जण आत्मघाती हल्ल्यात तसेच गोळीबारात ठार झाले होते, त्यामुळे ख्रिसमस व नववर्षदिनी भीतीचे वातावरण होते.
नववर्ष स्वागताच्या एक तास अगोदर पोलिसांनी म्युनिक येथील महत्त्वाची रेल्वेस्थानके रिकामी केली. किमान ५५० अधिकारी संशयितांचा शोध घेत आहेत. शहरात हल्ल्याची भीती अजूनही कायम आहे.
पोलीसप्रमुख हय़ुबेरट्स आँद्रे यांनी सांगितले, की काही संशयितांनी नववर्ष स्वागताच्या वेळी हल्ल्याचा कट आखला होता. फ्रेंडली इंटेलिजन्स सव्र्हिस या खासगी गुप्तचरांनी हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती, त्यात हा हल्ला मध्यरात्री होईल असे म्हटले होते, असे बावरियाचे अंतर्गत सुरक्षामंत्री जोआशिम हेरमान यांनी सागितले. रात्री १०.४० वाजता पोलिसांनी सर्व भाषांत सतर्कतेचा इशारा जारी केला व म्युनिक येथील मुख्य रेल्वे स्थानक रिकामे केले. रेल्वे स्थानकांवरची वाहतूक थांबवण्यात आली. पहाटे ३.३० वाजता दोन्ही स्थानके सुरू करण्यात आली. हल्ल्याचा कट आखला गेला होता याची खातरजमा झालेली नसली तरी खबरदारी घेण्यात येत आहे असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.
एका बातमीनुसार संशयित हल्लेखोरात सात इराकी लोक असून ते म्युनिकमध्ये राहात आहेत. जोडीने जाऊन हल्ले करण्याचा त्यांचा इरादा होता. रेल्वे स्टेशन व इतर गर्दीच्या ठिकाणी ते हल्ले करणार होते.
अमेरिकेत एकाला अटक
न्यूयॉर्क – आयसिसला पाठिंबा देणाऱ्या एका पंचवीस वर्षांच्या व्यक्तीस अमेरिकेत अटक करण्यात आली असून, नववर्षांच्या पूर्वसंध्येला रेस्टॉरंट्समध्ये हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. इमॅन्युअल लशमन असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.