बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बडोद्यात उसळलेल्या गर्दीत एकाचा मृत्यू झाला. त्यावरून भाजपने शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. भाजपने शाहरुख खानची तुलना दाऊद इब्राहिमशी केली आहे. गर्दी जमली म्हणजे लोकप्रियता मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. दाऊद इब्राहिमला पाहण्यासाठीही गर्दी जमते, असा टोला भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी लगावला आहे.

शाहरुख खानने रईस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेने प्रवास केला. बडोद्यात पोहोचलेल्या शाहरुखला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. त्यात एकाचा बळी गेला. यावरून भाजपचे नेते विजयवर्गीय यांनी शाहरुखला लक्ष्य केले. चित्रपटांचा प्रचार करण्याची एक नवी परंपरा रुढ झाली आहे. प्रचार करणाऱ्यांनी किमान सर्वसामान्य जनतेच्या सुविधांचा विचार करायला हवा. त्यांनी रेल्वेतून प्रवास करत आपल्या चित्रपटाचा प्रचार केला तर त्यामुळे सहाजिकच सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. दाऊदसुद्धा समोर आल्यास त्याला पाहण्यासाठी गर्दी उसळेल. त्यामुळे गर्दी जमली म्हणून लोकप्रियता मिळते, असा त्याचा अर्थ होत नाही, अशी टीका विजयवर्गीय यांनी केली.

याबाबत मी आणखी काही बोलणार नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ लोकांना समजला असेलच. अशा पद्धतीने चित्रपटांचा प्रसार करू नये. लोकांच्या सुविधांचाही विचार करायला हवा. चित्रपटाचा प्रसार लोकांना त्रास होणार नाही ना, याचा विचार करून करायला हवा, असेही ते म्हणाले. दरम्यान, ‘रईस’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेप्रवास करणाऱ्या शाहरूख खानला पाहण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर तुंबळ गर्दी होत आहे. सोमवारी रात्री बडोदा रेल्वे स्थानकावर शाहरूख पोहोचला असता त्याला पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे एकच धावपळ उडाली होती. या गर्दीत गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.