Shashant Shekhar in Bihar Elections: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागले आणि काँग्रेस-राजदच्या सत्ता पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरलं. भाजपासहित संपूर्ण सत्ताधारी एनडीएनं तब्बल २०२ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस व राजदसह विरोधी पक्षांच्या महाआघाडीला अवघ्या ३३ जागा मिळवता आल्या. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालं. एनडीएच्या या विजयरथासमोर विरोधी पक्षातील अनेक दिग्गज उमेदवारदेखील पराभूत झाले. त्यातच काही नवोदित उमेदवारांनादेखील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यातलंच एक नाव म्हणजे शशांत शेखर!
१ कोटींची नोकरी सोडून बिहारमध्ये!
३४ वर्षीय शशांत शेखर हे बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी तब्बल १ कोटी २ लाख रुपये पगाराची नोकरी करत होते. जर्मनीमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या हुद्द्यावर ते कार्यरत होते. मात्र, भारतात परत येण्याच्या आणि राजकीय जीवनात कार्यरत होण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे ते जर्मनीतील नोकरी सोडून बिहारमध्ये परतले. काँग्रेसनं शशांत शेखर यांना हाय प्रोफाईल अशा पटना साहिब मतदारसंघातून उमेदवारी दिली. २००८ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये हा पटना ईस्ट मतदारसंघातून नव्याने तयार झालेला मतदारसंघ आहे.
खरंतर या मतदारसंघात भाजपाचं प्राबल्य आधीपासून राहिलं आहे. पण शशांत शेखर यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि जोरकसपणे प्रचार केला. वेगळा विचार, सुशिक्षित प्रतिमा आणि नव्या पद्धतीच्या राजकारणाच्या आधारावर त्यांनी मतदारांना मतांचा कौल मागितला. पण १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीगणिक त्यांच्या अपेक्षांना खिंडार पडत गेलं. अंतिमत: तब्बल ३९ हजार ९०० मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
भाजपाच्या दिग्गजासमोर शशांत शेखर पराभूत
भारतीय जनता पक्षानं शशांत शेखर यांच्यासमोर पटना साहिब मतदारसंघातून रत्नेश कुशवाहा यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीत कुशवाहा यांना तब्बल १ लाख ३० हजार ३६६ मतं मिळाली, तर शशांत शेखर यांना ९१ हजार ४६६ मतं मिळाली. पराभव ३९ हजार मतांनी झाला असला, तरी शशांत शेखर यांचा विचार ९१ हजाराहून जास्त मतदारांनी स्वीकारल्याच्या भावना काँग्रेसकडून व्यक्त केल्या जात आहेत. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये दोघांमधील अंतर प्रचंड मोठं होतं. पण नंतरच्या काही फेऱ्यांमध्ये हे अंतर कमी करण्यात शेखर यांना यश आलं, पण विजयासाठी ते अपुरं ठरलं.
कोण आहेत शशांत शेखर?
शशांत शेखर यांच्या आजोबांनी चार वेळा पटना ईस्ट या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना एकदाही विजय मिळवता आला नाही. पण शेखर यांचं कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचं असल्यामुळे स्वत: शशांत शेखर यांनादेखील राजकीय ओढ होतीच. २०१४ साली दिल्ली आयआयटी आणि २०१७ साली आयआयएम कलकत्ता या देशातील अव्वल शिक्षण संस्थांमधून पदवी मिळवल्यानंतर शशांत शेखर यांनी सॅमसंगच्या इनोव्हेशन लॅबमध्ये नोकरी केली. नंतर काही काळ ते प्रशांत किशोर यांच्या I-PAC सारख्या राजकीय संशोधन संस्थांमध्येही काम करत होते. शेवटी त्यांनी जर्मनीत एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी स्वीकारली.
“माझ्या पदव्या मी भारतात मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भारताचाच अधिकार आहे. जर मी माझ्या लोकांचं भवितव्य घडवू शकतो, तर मग मी युरोंची निवड का करावी”, अशी ठाम भूमिका शशांत शेखर यांनी निवडणुकीआधी मांडली होती. निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता १.२ कोटी इतकी तर २.७ कोटींचं कर्ज त्यांच्यावर आहे. शिवाय, वार्षिक २४.३ लाखांचं उत्पन्न त्यांनी नमूद केलं आहे.
