दोन गटात विभागलेल्या अण्णाद्रमुक पक्षातील व्ही. के. शशिकला यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला. झाडाच्या दोन पानांचे पक्षाचे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्या गटाकडेच राहील, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर पलानीसामी यांनी आनंद व्यक्त केला आहे.


भाजपसोबत जवळीक वाढत असल्याचा आरोप पलानीसामी यांच्यावर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांना हा फायदा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे पलानीसामी यांनी म्हटले आहे. पक्षाचे बहुतांश आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन निवडणूक आयोगाने निर्णय आमच्या बाजूने दिल्याचे पलानीसामी यांनी म्हटले.


दोन पानांचे निवडणूक चिन्ह आमच्याकडेच राहील, या आदेशाची आम्हाला निवडणूक आयोगाकडून तोंडी सूचना मिळाली आहे. मात्र, आम्ही या निर्णयाच्या अधिकृत कागदपत्राची वाट पाहत आहोत, असे अद्रमुकचे खासदार व्ही. मैत्रेयन यांनी म्हटले.


तर दुसरीकडे, अद्रमुकमधील कथित लाच प्रकरणाची सुनावणी करताना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना टीटीव्ही दिनकरन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल न केल्यावरुन सुनावले आहे. न्यायालयाने पोलिसांना दोन आठवड्यांत या प्रकरणाच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर आरोपी सुकेशच्या न्यायालयीन कोठडीत ५ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अद्रमुकच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत दावा केला होता. या प्रकरणी शशिकला गटाकडून त्यांचे पुतणे दिनकरन हे प्रकरण हाताळत आहेत.