माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दरम्यान शिवदीप लांडे हे सध्या जे कल हाती येत आहेत त्यात पिछाडीवर आहेत आणि ते निवडणूक हरणार हे स्पष्ट आहे. कारण सध्या ते निवडणूक निकालांच्या फेऱ्यांमध्ये चौथ्या स्थानावर फेकले गेले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या पराभवाच्या घोषणेची फक्त औपचारिकता बाकी आहे. शिवदीप लांडे यांची ओळख दबंग अधिकारी अशी होती. त्यांनी पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणाच्या रिंगणात उतरणं पसंत केलं होतं.
बिहार निवडणुकीची मतमोजणी सुरु
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तसेच तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत. तसेच ओसामा शहाब हे देखील पिछाडीवर आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याबाबत बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं की “जनतेने ज्याला मतदान केलं आहे, तोच जिंकेल. राष्ट्रवादी विचाराधारा आणि सनातन संस्कृतीला मानणारे विजयी झाले पाहिजेत,” असं धीरेंद्र शास्त्री यांनी एनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान पिछाडीवर असणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवदीप लांडे हे नावही आहे. आररिया मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
शिवदीप लांडे पिछाडीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी शिवदीप लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवदीप लांडे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. ते आपले सासरे विजय शिवतारे यांच्या मतदारसंघातून म्हणजेच पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढवतील, असं सांगण्यात आलं होतं मात्र तसं झालं नाही. त्यांनी बिहारची निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे निश्चित आहे.
शिवदीप लांडे मूळचे महाराष्ट्रातले
शिवदीप लांडे हे मुळचे महाराष्ट्रातील असून त्यांचा जन्म अकोल्यात झाला आहे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी राहिली असली तरी त्यांची कर्मभूमी कायमच बिहार राहिली आहे. सिंघम अधिकारी म्हणून त्यांची बिहारमध्ये ओळख आहे. ते बिहारची राजधानी पाटणा, अररिया आणि पूर्णिया जिल्ह्याचे एसपी म्हणून कामकाज पाहिलं आहे. यानंतर ते राज्यपालांचे एडीसी देखील राहिले आहेत. काही काळासाठी त्यांची महाराष्ट्रात देखील बदली झाली होती. तेव्हा ते एटीएसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. आपल्या दबंगगिरीमुळे ते बिहारमधील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी राजकारणात एंट्री घेतली पण निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही हे स्पष्ट आहे.
