दिल्लीत रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, गजानन किर्तीकर यांच्यासह पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते येणार आहेत. याशिवाय, शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांनाही बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नक्की काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपने एकाही घटकपक्षाच्या नेत्याला स्थान दिले नव्हते. याद्वारे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने शिवसेनेला फारशी किंमत देत नाही, असा संदेश दिला होता. त्यानंतर केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणे शिवसेनेला महागात पडले, अशी चर्चाही रंगली होती. महाराष्ट्रात सत्ता टिकविण्यासाठी आणि भाजपला गरज भासेल, तेव्हा शिवसेनेचा वापर करुन घेऊन झुलवत ठेवायचे, अशी खेळी पंतप्रधान मोदी-शहांनी केली. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना महत्वाचे खाते देण्यात यावे, या शिवसेनेच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. शिवसेनेकडे चरफडत बसण्यापेक्षा कोणताही पर्याय नसल्याने आणि महाराष्ट्रात ते ‘स्वाभिमानी’ बाणा दाखवून सत्तेतून बाहेर पडणे शक्य नसल्याने भाजपने शिवसेनेचे फारसे लाड न करण्याचे व वेसण घालण्याचे धोरण भाजप श्रेष्ठींसह मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारल्याचे यावरून दिसून आले.

मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार?

रालोआ (एनडीए) मृतप्राय झाली आहे, असा हल्लाबोल करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा निवडणुकांच्या वेळी भाजपला पाठिंबा हवा असल्याने रालोआची आठवण येते,’ असे खडे बोल सुनावले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

चालकच अकार्यक्षम असेल तर गाडीचे पार्ट बदलून काय उपयोग; तेजस्वी यादवांची मोदींवर टीका