एका मुलीने बुरखा न घालता जीन्स घातल्यामुळे तिला दुकानातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आसामच्या बिस्वनाथ जिल्ह्यातील एका दुकान मालकाने या मुलीशी गैरवर्तन केलं आणि दुकानातून बाहेर काढल्याचा आरोप मुलीने केलाय. ही घटना बिस्वनाथ चारियाली येथील मोबाईल फोन अॅक्सेसरीजच्या दुकानात घडली. मुलगी या दुकानात इअरफोन खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानाचा मालक नुरुल अमीन याने तिला इअरफोन देण्यास नकार दिला. तसेच बुरख्याऐवजी जीन्स घातल्याबद्दल मुलीला लज्जास्पद वागणूक दिली, गैरवर्तन केले आणि त्यानंतर त्याने तिला दुकानाबाहेर ढकलले.

“जेव्हा मी दुकानात पोहोचलो तेव्हा दुकान मालकाने माझ्याशी गैरवर्तन केले आणि मला दुकानात पुन्हा न येण्यास सांगितले. त्याने मला दुकानातून बाहेर निघून जाण्यासही सांगितले. दुकानदार वयोवृद्ध असून तो आपल्या घरातून दुकान चालवतो. दरम्यान, दुकानदाराच्या कुटुंबातील कोणीही त्याच्या वागण्यावर आक्षेप घेतला नाही. माझी सून बुरखा किंवा हिजाब घालते, त्यामुळे मी जीन्स घालून त्याच्या घरी गेले तर त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होईल,” असं दुकानदाराने म्हटल्याचं मुलीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.

मुलगी घरी परतली आणि तिने संपूर्ण प्रकरण तिच्या पालकांना सांगितले. दुकान मालकाच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी तिचे वडील दुकानात गेले असता त्या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. “वृद्ध माणसाच्या दोन मुलांनीही माझ्या वडिलांशी गैरवर्तन केले आणि त्यांच्यावर हल्ला केला,” असा दावा मुलीने केला आहे. यासंदर्भात मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.