लैंगिक अत्याचाराविरोधात सुरु करण्यात आलेल्या ‘मी टू’ (#MeToo) या ऑनलाईन मोहिमेला टाइम मासिकाचा ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मी टू’ या ऑनलाईन हॅशटॅग अभियानातून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या अभियानाला जगभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता. हॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक हार्वे वाईनस्टिन यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण उजेडात आल्यावर ‘मी टू’ या ऑनलाईन मोहिमेला सुरुवात झाली होती.
लैंगिक अत्याचाराबद्दल लोकांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता त्याबद्दल बेधडक व्यक्त व्हावे, यासाठी ‘मी टू’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. लैंगिक अत्याचाराविरोधातील आवाज बुलंद करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू होता. याच मोहिमेला टाइम मासिकाने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर केला आहे. अमेरिकेत बुधवारी सकाळी याबद्दलची घोषणा करण्यात आली.
‘मी टू’ या ऑनलाईन अभियानाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाने देश, वर्ग, धर्म आणि स्त्री-पुरुष अशा सर्व सीमा ओलांडल्या. अनेकांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल या माध्यमातून भाष्य केले. ‘मी टू’ ही संज्ञा सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्त्या टॅराना बर्क यांनी २००६ मध्ये वापरली होती. लैंगिक अत्याचाराच्या पीडितांना बळ देण्यासाठी त्यांनी या संज्ञेचा वापर केला होता. दोन महिन्यांपूर्वी या संज्ञेचा वापर अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने केला होता. ‘जर तुम्ही लैंगिक अत्याचार किंवा हल्ल्याचे पीडित असाल, तर या ट्विटला ‘मी टू’ असा रिप्लाय द्या,’ असे आवाहन तिने केले होते. १५ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या या आवाहनला मोठा प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील सेलिब्रिटी या अभियानात सहभागी झाले होते. यासोबतच सामान्य नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
वर्षभरातील घडामोडींवर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या व्यक्ती किंवा बातमीला टाइम मासिकाकडून ‘पर्सन ऑफ द इयर पुरस्कार’ दिला जातो. यामुळे या पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगदेखील शर्यतीत होते. मात्र या दोन्ही अध्यक्षांना मागे टाकत ‘मी टू’ या अभियानाने ‘पर्सन ऑफ द इयर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार पटकावला.