झारखंडच्या जमशेदपूर येथून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दुःखद बातमी समोर आली आहे. झारखंडमध्ये नववर्षाची पार्टी करून घरी परतणाऱ्या आठ मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. जमशेदपूर येथील बिष्टूपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्किट हाऊस परिसरात सदर अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की, त्यात गाडीचा चुराडा झाल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात चाललेली गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे जाऊन झाडावर आदळून उलटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी झाडावर आदळून उलटली तेव्हा त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकायला गेला. ज्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. गाडीमध्ये बसलेले सहा युवक जागीच ठार झाले तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीतील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले. मृत युवक कुलुप्तांगा भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

जमशेदपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कौशल किशोर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पाच जण बसण्याची क्षमता असलेल्या गाडीत आठ युवक बसले होते. गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे असल्येल्या झाडावर फेकली गेली. गाडीतील पाच युवक जागीच ठार झाले, तर इतर तिघांना रुग्णालयात नेले असताना त्यापैकी एकाचा वाटेतच मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. गाडी अतिवेगात होती, असेही ते म्हणाले.

कौशल किशोर पुढे म्हणाले की, या अपघाताची तीव्रता इतकी होती की, आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटर आणावे लागले होते. हे सर्व तरूण लिट्टी पार्टी (बिहारमधील लोकप्रिय प्रकार) करण्यासाठी रविवारी रात्री गेले होते. पहाटे ४.३० वाजता ते जमशेदपूरला जाण्यासाठी निघाले, यावेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना हा प्रवास करून नका, असे बजावले होते. मात्र तरीही युवक भल्या पहाटे घरी येण्यासाठी निघाले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट टाकून त्यांनी शोक व्यक्त केला.

“जमशेदपूरमध्ये झालेल्या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला, ही बातमी दुःखद आहे. परमेश्ववर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी आशा व्यक्त करतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री सोरेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six killed two critical after car rams divider in jharkhands jamshedpur kvg
First published on: 01-01-2024 at 12:34 IST