आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांची अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे त्यांना आजच अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीसांचे पथक सोमनाथ भारती यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. मात्र, स्वतः भारती सध्या निवासस्थानी नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सोमनाथ भारती सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे.
पत्नी लिपिका मित्रा यांनी सोमनाथ भारती यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा प्रयत्नाचाही गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदविण्यात आला आहे. सोमनाथ भारती यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि त्यांची जामीन याचिका फेटाळली. रात्री उशीरा पोलीस ठाण्यात गेल्याबद्दलही न्यायालयाने सोमनाथ भारती यांना कडक शब्दांत तंबी दिली. सत्र न्यायालयाने अटकपू्र्व जामीन याचिका फेटाळल्यानंतर सोमनाथ भारती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.