फोर्बस् या नियतकालिकाने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनांनुसार जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पहिल्या २० जणांमध्ये समावेश करण्यात आला आहे; तर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी सलग दुसऱ्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे.
सात अब्ज लोकसंख्या असलेल्या या जगाला आकार देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने ‘चालविणाऱ्या’ प्रभावशाली ७१ व्यक्तींची यादी फोर्बस् या नियतकालिकाने जाहीर केली.  राष्ट्रप्रमुख, विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक आणि परोपकारी व्यक्ती यांचा या यादीमध्ये समावेश आहे.  यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या यादीमध्ये १२वे स्थान मिळवले असले तरी त्यांची गतवर्षीच्या तुलनेत एका स्थानाने घसरण झाली आहे. भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा या यादीत २० क्रमांक आहे. मात्र भारताच्या आर्थिक सुधारणांच्या या शिल्पकाराचा संयमी बुद्धिवाद हा अलीकडे बुजरेपणा म्हणून पाहिला जात आहे, असे मत फोर्बस्ने नोंदविले आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या यादीत ३७ वे स्थान पटकाविले आहे. रिलायन्स कंपनी ही भारताची सर्वात मौल्यवान कंपनी असून अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे मत नियतकालिकाने व्यक्त केले आहे. आर्सेलर मित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल हे या यादीत ४७ व्या क्रमांकावर आहेत.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओबामांचे दुसऱ्या वर्षी यादीत सर्वोच्च स्थान
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. ५१ वर्षीय ओबामा हे जगातील सर्वात मोठय़ा लष्कराचे प्रमुख तर आहेतच, पण त्याचबरोबर जगाची आर्थिक आणि सांस्कृतिक महासत्ता असणाऱ्या एकमेव देशाचे – मुक्त जगाचे खरे नेते आहेत, असे प्रशंसोद्गार फोर्बस्ने ओबामांबद्दल काढले आहेत. ‘युरोपियन युनियनचा खराखुरा कणा’ असणाऱ्या अ‍ॅंजेला मर्केल यांनी या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.

निकष काय?
एकाद्या व्यक्तीचा प्रभाव – त्या व्यक्तीची हुकमत किती जणांवर आहे, व्यक्तीचे आर्थिक संसाधनांवरील नियंत्रण, व्यक्तीची सामथ्र्य क्षेत्रे आणि व्यक्तीच्या प्रभावाची परिणामकारकता या बाबींचा विचार ही यादी तयार करताना करण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soniya manmohan in forbs list
First published on: 07-12-2012 at 06:35 IST