विवाह जुळवताना कुंडली, पत्रिका हे सगळे बघितले जाते. अगदी ३६ गुणही जुळतात पण नंतर तो विवाह टिकतोच असे नाही. बहुतांश विवाह हे टिकलेले दिसतात पण त्यात तडजोडही बरीच असते. मग जोडीदार निवडण्याची आदर्श पद्धत कोणती, त्यावर रक्तगटांची जुळणी व तपासणी असे एक उत्तर विज्ञानाने दिले. नंतर जनुकीय कुंडली जमवण्याचे अधिक समर्पक असे उत्तर सामोरे आले. आता तर घरीच काही चाचण्या करून तुम्ही ज्याला जीवनसाथी निवडणार आहात तो किंवा ती एकमेकांना अनुकूल आहेत किंवा नाही याची तपासणी करता येणार आहे. अनेकदा प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातातही पण प्रत्यक्षातील यशस्वी विवाहांचे गणित वेगळे असते. अनेक प्रेमिकांच्या प्रेमाचा शेंदूर हा पहिल्या काही महिन्यातच विरून जातो अन् त्यांचे खरे रूप सामोरे येते. त्यामुळेच डीएनए चाचण्या ही अधिक विश्वासार्ह पद्धत मानली जात आहे.
यात तज्ज्ञ तुमच्या केसाचा एक धागा घेतात व नंतर एक यूएसबीसारखे उपकरण लॅपटॉपला जोडले जाते. त्याच्या मदतीने तुमचा जोडीदार तुम्हाला दगा देणारा आहे किंवा नाही हे समजते. तुमच्या सुपरमार्केटच्या शेल्फमध्ये असे डीएनए चाचणीच्या आधारे जोडीदाराची परीक्षा करणारे उपकरण तुम्हाला दिसणार आहे असे ‘द एज’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ प्रा. मायकेल गिलिंग्ज यांनी सांगितले की, हे आता अपरिहार्य आहे. या चाचण्या करण्यासही सोप्या, स्वस्त व घरी करता येण्यासारख्या आहेत.
या चाचण्यात नॅनोपोअर डीएनए सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यात एखादी व्यक्ती दीर्घकाळ तुमची साथ करणार आहे की, फसवणूक करणार आहे हे समजते. ऑक्सिटोसिन (वचनबद्धतेशी संबंधित संप्रेरक, न्यूरोटान्समीटर) व व्हॅसोप्रेसिन (एकनिष्ठतेशी संबंधित संप्रेरक) यांना नियंत्रित करणाऱ्या जनुकांची एक जंत्रीच तयाक केली जाते. जेव्हा तुम्ही नवीन व्यक्तीबरोबर जाता तेव्हा त्या व्यक्तीचा डीएनए नमुना तुम्हाला मिळू शकतो, त्यांची क्रमवारी निश्चित केली तर तुम्हाला त्याच्याविषयी त्याच्या नकळत बरेच काही कळू शकते. त्या व्यक्तीचा जनुकीय नमुना तुम्हाला ती व्यक्ती स्वैराचारी आहे की नाही याचे निश्चित अनुमान देऊ शकते. गिलिंग्ज यांच्या मते जनुकीय चाचण्या लवकरच व्यावसायिकदृष्टय़ाही लोकप्रिय होतील. डीएनए जोडी जुळणीत तुम्ही डीएनए नमुना सादर करायचा व तो तुमच्याशी जुळणारा आहे की नाही हे सांगितले जाईल.