यादव कुटुंबीयात कोणताही वाद नसल्याचा पुनरुच्चार समाजवादी पक्षाचे सुप्रिमो मुलायमसिंह यादव यांनी केला आहे. आमच्या कुटुंबीयात गेल्या तीन पिढ्यांपासून वाद नाही आणि भविष्यातही नसेल असा दावा त्यांनी लखनऊ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमदारच मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. निवडणूक पूर्व चाचणीत भाजपला बहुमत तर समाजवादी पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर दाखवण्यात आले आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले निवडणुका तर होऊ द्या, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचा रथ ही चालेल आणि सायकलही पळेल.
समान नागरी कायद्याबाबत देशभर सुरू असलेल्या चर्चेबाबत मात्र मुलायमसिंह यादव यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. समान नागरी कायद्याबाबत कोणताही वाद नाही. भविष्यातही नसावा असे त्यांनी म्हटले. समान नागरी कायद्याचा प्रस्ताव सर्वात प्रथम लोहिया यांनी ठेवला होता. गीता, रामायण, कुराण सर्व धर्मग्रंथांमध्ये मानवतेचा संदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरूवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कठोर भाषा वापरली होती. मी कुणाचीही वाट न पाहता निवडणुकीचा प्रचार सुरू करणार असल्याचे म्हटले होते. शिवपाल माझे काका आणि मुलायमसिंह हे माझे वडील आहेत. ते मी बदलू शकत नाही अशा शब्दांत आपला रोष व्यक्त केला होता. काही वेळासाठी माझ्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते पण बाजूला नाही. राज्यातील जनतेचा मला पाठिंबा आहे. आम्ही पुन्हा सत्ता मिळवू असा विश्वासही व्यक्त केला होता.