श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जून रणतुंगा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत, असा मोठा आरोप अर्जून रणतुंगा यांनी केला आहे. २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकातील श्रीलंकेच्या टीमच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रणतुंगा यांनी ही टीका केली आहे.

श्रीलंकेतील डेली मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्जून रणतुंगा म्हणाले, “श्रीलंका क्रिकेटचे अधिकारी आणि जय शाह यांच्या संबंधांमुळे बीसीसीआयला असं वाटतं की, ते श्रीलंकेचं क्रिकेट नियंत्रित करू शकतात. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत. जय शाह यांच्या दबावामुळे श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त होत आहे.”

“वडील गृहमंत्री म्हणून जय शाह शक्तीशाली”

“भारतातील एका व्यक्तीमुळे श्रीलंकेच्या क्रिकेटचं हे नुकसान होत आहे. जय शाह हे केवळ त्यांचे वडील अमित शाह भारताचे गृहमंत्री आहेत म्हणून इतके शक्तीशाली आहेत,” असंही अर्जून रणतुंगा यांनी म्हटलं.

श्रीलंकेचा संघ २०२५ मधील चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पात्र नाही

मागील काही दिवसांमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेच्या टीमचं वाईट प्रदर्शन झालं आहे. गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ नवव्या क्रमांकावर खाली आला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ २०२५ मधील चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पात्र ठरला नाही.

श्रीलंकेच्या क्रिडामंत्र्यांकडून क्रिकेट मंडळ बरखास्त

या कामगिरीनंतर श्रीलंकेचे क्रिडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट मंडळ बरखास्त केलं. तसेच श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जून रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखालील एक हंगामी समिती नेमली. मात्र, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने क्रिडामंत्र्यांच्या या निर्णयाला १४ दिवसांची अंतरिम स्थगिती दिली.

हेही वाचा : श्रीलंका: आर्थिक संकटाचा संताप रस्त्यावर; राष्ट्रपतींच्या घरासमोर हिंसक आंदोलनात जाळपोळ अन् दगडफेक, ४५ जणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसीकडून श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाचं निलंबन

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सरकारकडून क्रिकेट प्रशासनात जास्त हस्तक्षेप होतोय असं कारण देत आयसीसीने श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केलं होतं.