वर्गातील व्रात्य मुलांना ताळ्यावर आणण्यासाठी शिक्षक त्यांना बाकावर उभे राहण्याची शिक्षा अनेकदा सुनावत असतात. मात्र पाकिस्तानमधील न्यायालयानेही आपल्या एका अधिकाऱ्याला खोटी माहिती दिल्याच्या कारणामुळे न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा सुनावली.
लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सय्यद मन्सूर अली शाह यांनी फैझाबाद जिल्ह्य़ातील मुझ्झफर हक या सरकारी अधिकाऱ्याला शिपाई भरती प्रकरणी खोटी माहिती दिल्याबद्दल न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणी मोहम्मद इरफान यांनी याचिका दाखल केली होती.
जिल्हा प्रशासनाने शिपाई भरतीसाठी जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये केवळ आपले नाव होते, असे असताना अधिकाऱ्याने या यादीकडे दुर्लक्ष केले व या पदाकरता अर्जही न करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक केली असा दावा इरफान यांनी याचिकेत केला होता. हक यांनी इरफान यांचा दावा फेटाळत निवड झालेल्या व्यक्तीचे नाव गुणवत्ता यादीमध्ये असल्याचे न्यायालयात सांगितले.
मात्र सुनावणीदरम्यान हक यांची माहिती चुकीची असल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना उभे राहण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे.