पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

अमेरिका भेटीत आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीवर आधारित संबंध अधिक दृढ करणार असून जपान व ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरचे संबंधही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिका दौऱ्यावर रवाना होताना सांगितले.

आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी ते अमेरिकेला रवाना झाले असून तत्पूर्वी त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत. बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना झाले त्यानंतर त्यांनी ट्वीट संदेशात विमानात बसतानाचे छायाचित्र टाकले आहे. त्यांनी म्हटले आहे की,  २२ ते २५ सप्टेंबर या काळात आपण अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेला जात आहोत. या भेटीत भारत व अमेरिका यांच्यातील संयुक्त व सर्वंकष भागीदारी अधिक दृढ केली जाईल. प्रादेशिक व जागतिक पातळीवरील मुद्द्यांवर बायडेन यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मोदी यांनी सांगितले की, ते क्वाड देशांच्या बैठकीस उपस्थित राहणार असून त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा व अमेरिकी अध्यक्ष जो बायडेनही सहभागी होणार आहेत. क्वाड देशांची आभासी बैठक मार्च महिन्यात झाली होती पण आता प्रत्यक्ष या नेत्यांना भेटण्याची संधी मिळत आहे. मार्चमधील बैठकीच्या फलश्रुतीचा आढावा यावेळी घेण्यात येईल. हिंद-प्रशांत क्षेत्रातील परिस्थितीवरही चर्चा होईल. आपल्या अमेरिका भेटीतून त्या देशाबरोबरच्या धोरणात्मक भागीदारीला बळ मिळणार असून जपान व ऑस्ट्रेलियासारख्या देशांशी असलेले संबंधही मजबूत होणार आहेत.

दरम्यान बायडेन यांनी आयोजित केलेल्या कोविड १९ शिखर बैठकीस मोदी उपस्थित राहणार असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले असून अफगाणिस्तानचा मुद्दा हा मोदी व बायडेन यांच्या द्विपक्षीय चर्चेत महत्त्वाचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. २४ सप्टेंबरला सायंकाळी मोदी हे आमसभेच्या अधिवेशनासाठी न्यूयॉर्कला रवाना होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.