ओटावा : कॅनडातील रिचमंड हिल शहरातील एका विष्णू मंदिराच्या आवारात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळय़ाची अज्ञात व्यक्तींकडून विटंबना करण्यात आली आहे. यॉर्क पोलिसांनी या प्रकरणी द्वेषपूर्ण गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे कॅनडातील भारतीय नागरिक संतप्त झाले आहेत.
रिचमंड हिल शहरात जुने विष्णू मंदिर असून या मंदिराच्या आवारात ३० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला. याँज मार्गावरील गार्डन अव्हेन्यू परिसरात हे मंदिर आहे. पाच फुट उंच असलेल्या या पुतळय़ावर कुणीतील अर्वाच्च शब्द लिहिले असून गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारात अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. ‘द्वेष पसरवण्यासाठी कुणीतरी पुतळय़ाची विटंबना केली आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.
या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. बुधेंद्र दुबे यांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षांपासून महात्मा गांधींचा पुतळा या ठिकाणी आहे. मात्र अशा प्रकारचे कृत्य कुणीही केले नव्हते. आम्ही अनेक वर्षे रिचमंड हिल शहरात शांततापूर्ण वातावरणात राहत आहोत. पण अशा प्रकारचा तिरस्कारजन्य प्रकार कधीही झाला नव्हता.
भारतीय उच्चायुक्तालयाकडून निषेध
टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावास आणि ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेचा निषेध केला. दोघांनीही या गुन्ह्याबाबत कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले. वाणिज्य दूतावासाने याला ‘गुन्हेगारी, घृणास्पद कृत्य’ म्हटले आहे. या गुन्ह्यामुळे भारतीय समुदायात चिंता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे, असे उच्चायुक्तांनी म्हटले आहे.