आजारपण आणि त्यासाठी येणारा खर्च ऐकला की सामान्यांच्या तोंडचे पाणीच पळते. हृदयरोग ही आता अतिशय सामान्य समस्या झाली आहे. हृदयरोग झाल्यावर हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमती आवाक्याबाहेरच्या असल्याने अनेकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. पण आता या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत कमी करण्यात आली असून त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी वाढविण्यात आलेल्या या स्टेंटच्या किंमतीत कपात करण्यात आल्याने देशातील नागरिकांचा आरोग्यसेवेवरील खर्च काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून ही किंमत कमी करण्यात आली असून त्याबाबतचा अधिकृत नियम जाहीर करण्यात आला आहे. आता ड्रग एल्यूटींग स्टेंटची (डीईएस) किंमत २७,८९० रुपये करण्यात आली आहे. याआधी या स्टेंटची किंमत २९,६०० रुपये होती. याशिवाय अँजिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅथेटर, बलून्स आणि गाईड वायर्स यांच्या किंमतीतही घट करण्यात आली आहे. तर बेअर मेटल स्टेंटची किंमत २६० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा स्टेंट आता ७,६६० रुपयांना मिळणार आहे.

नुकत्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात स्टेंटच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हानिर्णय तत्काळ घेण्यात आला आहे. नव्याने ठरविण्यात आलेली स्टेंटची किंमत ३१ मार्च २०१९ पर्यंत लागू असेल असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे. अनेकदा जवळच्या माणसाचा जीव वाचायला हवा यासाठी इकडून-तिकडून पैसा जमवलाही जातो. मात्र नंतर त्याची परतफेड करता करता नाकात दम येतो. पण केंद्राच्या या निर्णयामुळे या लोकांचा खर्च आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.