ढाका हल्ल्यानंतर तस्लिमा नसरीन यांचे ट्विट

बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी थेट इस्लाम धर्मावर शरसंधान साधले आहे. इस्लाम हा शांततावादी धर्म असल्याचे म्हणणे आता बंद करा, असे ट्विट नसरीन यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ढाक्यातील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी एका मागोमाग ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. बांगलादेशातील नागरिकांचा जगातील ३६ देशांमधील दहशतवादी संघटनांमध्ये सहभाग असल्याचा आरोपही तस्लिमा यांनी यावेळी केला. बांगलादेश दहशतवादाला खतपाणी घालत आहे. इस्लामच्या नावाखाली जगात दहशतवाद पसरविला जात आहे. त्यामुळे कृपा करून आता तरी इस्लामला शांततावादी धर्म म्हणणे बंद करा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ढाकामध्ये हल्ला करणाऱया दहशतवादी उच्च शिक्षीत होते. त्यांनी निब्रस इस्लाम तुर्की होप्स स्कूल, नॉर्थसाऊथ आणि मोनाश या नावाजलेल्या विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. इस्लामच्या नावावर त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले आणि त्यांना दहशतवादी बनविण्यात आल्याचीही माहिती तस्लिमा यांनी ट्विटमध्ये दिली आहे.