करोनाचा कहर देशभरात जाणवतो आहे. अशात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अशात देशातल्या अनेक राज्यांमध्ये स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. ते आपल्या राज्यात, आपल्या घरी पोहचू शकलेले नाहीत. अशात अहमदाबादमध्ये परवेझ अन्सारी नावाचा एक मजूर अडकून पडला आहे. हा मूळचा झारंखडचा आहे. तो बरा आहे का? याबाबत त्याच्या कुटुंबीयांना काहीही माहिती नव्हती. त्याने जेव्हा कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्याच्या घरातल्यांना त्याला पाहून धक्काच बसला.

१९ वर्षांचा परवेझ रविवारी सकाळी तापाने फणफणला. त्याला खोकलाही झाला. त्याने रांचीमध्ये आपल्या घरातल्यांना व्हिडीओ कॉल केला. त्याला पाहून घरातल्यांना धक्काच बसला. “मी भूकेने व्याकूळ झालो आहे. मला बरं नाही” असं म्हणताना त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. त्याचे वजनही बरेच कमी झाल्याचे दिसत होते. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या घरातल्यांनी त्याला स्वतःचा एक व्हिडीओ तयार करुन पाठवण्यास सांगितला. त्याप्रमाणे परवेझने हा व्हिडीओ पाठवला. त्यानंतर परवेझच्या कुटुंबीयांनी हा व्हिडीओ झारखंडचे ओएसडी भोरसिंह यादव यांना दाखवला. माझी प्रकृती चांगली नाही मला घरी जायचं आहे असं परवेझ या व्हिडीओत म्हणत होता. अशी माहिती यादव यांनी दिली.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना भोरसिंह यादव म्हणाले की, “त्या मजुराची उपासमार झाल्याचे दिसत होते. त्याला वाचवण्यासाठी आम्ही अहमदाबाद पोलिसांशी संपर्क केला. एक पथक त्याच्या घरी पोहचलं तेव्हा लक्षात आलं की परवेझ बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. त्याला शेजारी जेवण आणून देत होते मात्र तो आजारी असल्याने काही खाऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याची प्रकृती जास्त खालावली. आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.”

रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे लक्षात आलं की परवेझ अन्सारीला टीबी झाला आहे. तसंच त्याची किडणीही कार्यरत नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये केलेल्या चाचण्यानंतर हे लक्षात आलं की परवेझला करोना नाही. अहमदाबाद येथील ज्या विभागात तो वास्तव्य करत होता तिथले सगळे मजूर निघून गेले आहेत. त्याच भागात राहणाऱ्या काही शेजाऱ्यांनी परवेझला रोज जेवण नेऊन दिलं मात्र तो आजारी झाल्याने काहीही खाऊ शकला नाही.

“परवेझ दीड वर्षापूर्वी अहमदाबादला गेला होता. तो एका पॅकेजिंग कंपनीत काम करत होता. १२०० रुपये प्रति महिना भाडे तत्त्वावर तो एका खोलीत राहात होता. २० मार्चला त्याने सांगितलं होतं की माझी तब्बेत बरी नाही तेव्हाच आम्ही त्याला परत ये सांगितलं होतं. मात्र पुरेसे पैसे त्याच्याकडे नव्हते. आम्ही मोबाइल बँकिंग द्वारे त्याला पैसेही पाठवले. मात्र लॉकडाउनमुळे तो परतू शकला नाही ” अशी माहिती त्याच्या भावाने दिली. आता परवेझला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्याच्यावर उपचार सुरु आहेत.