एका विद्यार्थ्याने दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हातून झालेला अपमान सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथील एका खासगी महाविद्यालयात ही घटना घडली. मृताचे नाव एम कुमार आहे. त्याने झालेल्या अपमानाबद्दल व्हॉईस नोट रकॉर्ड करून ती जारी केल्यानंतर ट्रेनसमोर उडी मारली. व्हॉईस नोटमध्ये, कुमारने म्हटलंय की, त्याला प्रतिस्पर्धी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दान म्हणून दिलेले जीवन जगायचे नाही.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये शत्रुत्व आहे. थिरुनिनरावूर रेल्वे स्थानकावरील दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मृताचा छळ केल्याचा संशय पोलिसांना आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कर्मचार्‍यांनी एका विद्यार्थ्याचा वाढदिवस ट्रेनमध्ये साजरा केल्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर कुमारच्या कॉलेजमधील विद्यार्थी रेल रोको करत होते. या आंदोलनादरम्यान कुमारचा छळ झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कुमार रात्रीपर्यंत रेल्वे स्टेशनजवळ थांबला आणि नंतर त्याने आत्महत्या केली.

दरम्यान, मृत कुमारने व्हॉईस नोटमध्ये कोणाचेही नाव, कोणत्याही महाविद्यालयाचे किंवा तो त्याचा कसा अपमान झाला, कोणत्या प्रकारचा छळ झाला हे सांगितलेले नाही. ग्रुप कल्चरच्या प्रभावाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कॉलेज कॅम्पसमध्ये छेडछाडीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस दोन्ही महाविद्यालयांशी संपर्क साधत आहेत.