सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाने एलजीबीटी समुदयाला मोठा दिलासा देत समलैंगिकतेला गु्न्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. मात्र, कोर्टाच्या या निकालानंतर काही वेळातच भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, या निर्णयामुळे एड्सच्या प्रमाणात वाढ होईल असे वादग्रस्त व्यक्तव्यही त्यांनी केले आहे.

स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून पुन्हा बदललाही जाऊ शकतो. परस्परसंमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांमुळे सामाजात वाईट गोष्टींच्या प्रमाणात वाढ होईल. समलैंगिकता एक जेनेटिक डीसऑर्डरची समस्या असून यामुळे सेक्शुअल ट्रन्समिटेड डिसीज (एसटीडी) अर्थात लैंगिक संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होईल. यामुळे देशात एचआयव्ही एड्सच्या प्रमाणात वाढ होईल. याला आपण वैयक्तिक लैंगिक कृत्याच्या रुपात पाहू शकत नाही, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने कलम ३७७ वर ऐतिहासिक निर्णय देत समलैंगिकतेला मान्यता दिली आहे. म्हणजेच दोन सज्ञान व्यक्तींमधील समलैंगिक संबंधांना आता गुन्हा मानले जाणार नाही. कोर्टाने म्हटले की, एलजीबीटी समुदायाला देखील संबंधांचा अन्य नागरीकांप्रमाणे समान नागरी आणि मुलभूत हक्क आहे. आपली ओळख कायम ठेवणे जीवनात महत्वाचे असल्याचेही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटले आहे. स्वतःला व्यक्त न करता येणे हे मरणासमान आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे देशातील १५८ वर्षांपूर्वीचा जुना ब्रिटिशांचा कायदा आता संपुष्टात आला आहे.