टी -20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल देशातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधानंतर आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही या सामन्याला विरोध केला आहे. स्वामींनी ट्विट करून भारत-पाक सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी थेट अमित शहा आणि त्यांचा मुलगा जय शाहवर निशाणा साधलाय.

सुब्रमण्यम स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलंय, “त्यांचे वडील गृह मंत्रालय सांभाळतात हे बीसीसीआयच्या जय शाह यांना माहित आहे का, असा सवाल त्यांनी केलाय. सोबतच स्वामींनी अंडरवर्ल्ड डॉनच्या सट्टेबाजीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वामी म्हणाले, “टेरर सेल्समन पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करण्याची काय गरज आहे? बीसीसीआयचे जय शाह यांना माहित आहे का की त्यांचे वडील गृहमंत्री म्हणून काय उपदेश करत आहेत? सट्टेबाजीतून पैसे मिळवून देणाऱ्या दुबई डॉन्ससाठी क्रिकेट खेळणं अनिवार्य आहे. त्यामुळे हा क्रिकेट सामना रद्द करा आणि देशाचा सन्मान वाचवा”.

सुब्रमण्यम स्वामींच्या आधी भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा पुनर्विचार व्हायला हवा, असे गिरीराज सिंह सोमवारी म्हणाले होते.