ब्रिटनमधील केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका या संस्थेने फेसबुकच्या ५ कोटी खातेदारांच्या खासगी माहितीचा गैरवापर केल्याच्या प्रकरणी सुनावणीसाठी अमेरिकी काँग्रेसच्या शक्तिशाली समितीने फेसबुक, ट्विटर व गुगल या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समन्स पाठवले असून पुढील महिन्यात त्यांची सुनावणी होणार आहे.

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग व गुगल व ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई व जॅक डोरसी यांना सिनेटच्या न्याय समितीसमोर १० एप्रिलला पाचारण करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष चक ग्रॅसली यांच्यापुढे या सर्वाना बाजू मांडावी लागणार आहे. ग्रॅसली यांनी निवेदनात म्हटले आहे की, झकरबर्ग यांना त्यांच्या कंपनीच्या  ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण कसे करता येईल  याबाबत चालू व आगामी धोरणांवर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. माहिती गोळा करण्यातील  खासगी मानके , ग्राहकांच्या माहितीचा व्यावसायिक वापर यावर चर्चा होईल. माहितीचा गैरवापर कोणत्या प्रकारांनी केला जाऊ शकतो, फेसबुकसारख्या कंपन्या त्यावर काय उपाय करू शकतात याची तपासणी केली  जाणार आहे.

ग्रॅसली यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई व ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोरसी यांनाही माहिती गुप्ततेच्या मुद्दय़ावर समाज माध्यम उद्योगात काय पावले उचलता येतील यावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. यात नवीन नियमावली कशा तयार करता येतील, नावीन्याला उत्तेजन देतानाच ग्राहकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील यावर चर्चा करण्यात येणार आहे.

माहितीच्या सुरक्षेबाबत सिनेटर मार्क वॉर्नर यांनी तंत्रज्ञान कंपन्यांकडून अनेक प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांनी सांगितले की,  फेसबुक, गुगल, ट्विटर यांचे यश मोठे आहे यात वादच नाही, पण त्यांच्या या शक्तिशाली रूपाबरोबरच त्यांच्यावर जबाबदारी पडते ती त्यांनी मान्य करावी. हा केवळ रशियाने अमेरिकी निवडणुकीत समाज माध्यमातून केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा नाही. जर आपण नागरी संकेत व सौहार्दपूर्ण तसेच खुल्या निवडणुका मान्य करणार असू तर या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांशिवाय इतर जनतेलाही उत्तरे द्यावी लागतील.सिनेटर एड मार्की यांनी सांगितले की, फेसबुकला लाखो अमेरिकी खातेदारांची माहिती सुरक्षित ठेवता आली नाही हे केंब्रिज अ‍ॅनॅलॅटिका प्रकरणात दिसून आले आहे. त्यामुळे या कंपन्या त्यांचे स्वनियंत्रण करू शकत नाहीत हे स्पष्ट होत आहे.

स्थलांतरित शोधण्यासाठीही माहितीचा वापर

दरम्यान, ‘ इंटरसेप्ट ’ या ऑनलाईन न्यूज प्रकाशनाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या स्थलांतर  विभागाने स्थलांतरितांची माहिती घेण्यासाठी फेसबुकचा वापर केला आहे.

फेसबुकची अमेरिकेत एफटीसीकडून चौकशी

वॉशिंग्टन : पाच कोटी ग्राहकांच्या व्यक्तिगत माहितीचा ब्रिटनच्या केंब्रिज अ‍ॅनॅलॅटिका या कंपनीने गैरवापर केल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या संघराज्य व्यापार आयोगाने (एफटीसी) फेसबुकची चौकशी सुरू केली आहे. एफटीसीने म्हटले आहे, की फेसबुकच्या व्यक्तिगतता संकेतांची खुली, पण सार्वजनिक स्वरूप नसलेली चौकशी सुरू आहे. फेसबुक ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर झाल्याच्या प्रकरणी प्रसारमाध्यमातून चिंता व्यक्त झाली होती, त्याची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे, असे एफटीसीचे हंगामी संचालक टॉम पाल यांनी सांगितले.

ते म्हणाले, की एफटीसी सर्व साधनांचा वापर करून ग्राहकांच्या खासगी माहितीचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे. फेसबुकसारख्या कंपन्यांकडे ग्राहकांच्या खासगी माहितीचे संरक्षण करण्याची साधने आहेत, पण ती अपयशी ठरली. त्यांनी ‘प्रायव्हसी शिल्ड’ साधनाचा योग्य वापर केला नाही. ज्या कंपन्यांची यापूर्वी एफटीसीने चौकशी केली होती त्यांनाही आता सुरक्षा संकेत पाळावे लागणार आहेत. लाखो फेसबुक ग्राहकांच्या व्यक्तिगत माहितीचा वापर करण्यास त्रयस्थ कंपन्यांना परवानगी दिल्याच्या आरोपाबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना ३७ राज्यांच्या महाधिवक्त्यांनी एक पत्र पाठवले असून त्यात या सगळय़ा प्रकाराबाबत उत्तरे मागितली आहेत. फेसबुकडून त्यांच्या व्यावसायिक पद्धती व माहिती सुरक्षिततेबाबतची माहिती मागवली आहे. या पत्रावर न्यूजर्सीचे महाधिवक्ता गुरबीर ग्रेवाल यांचीही स्वाक्षरी आहे. फेसबुकच्या ५ कोटी ग्राहकांच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर झाल्याचे उघड झाल्यानंतर मार्क झकरबर्ग यांनी जाहीर माफीनामाही प्रसिद्ध केला होता.

वापरकर्त्यांच्या परवानगीविना फेसबुकने केंब्रिज अ‍ॅनॅलॅटिका या कंपनीला माहितीचा गैरवापर क सा करू दिला असे प्रश्न महाधिवक्त्यांनी त्यांच्या पत्रात केला आहे. फेसबुकवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, अशी टीकाही त्यात केली आहे.