एकमेकांशी व्यवहार करायचा असेल तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी समजुतदारपणा आणि आत्मविश्वास दाखविण्याची गरज असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. त्या बुधवारी इस्लामाबादमधील ‘हार्ट ऑफ एशिया’ या पाचव्या मंत्रीस्तरीय बैठकीत बोलत होत्या. जागतिक परिस्थितीत बदल घडत असून अशा वातावरणात जगाकडून पाकिस्तानसाठी सहकार्याचा हात पुढे केला जात आहे. कोणत्याही नावाखाली किंवा कोणत्याहीप्रकारे दहशतवादी आणि अतिरेकी शक्तींना अभय मिळेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी सुषमा स्वराज यांनी परिषदेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय समुदायांना केले. या बैठकीच्या निमित्ताने आम्ही पाकिस्तानच्या दिशेने हात पुढे करत आहोत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी समजुतदारपणा दाखविण्याची हीच वेळ आहे. या माध्यमातून दोन्ही देशांनी प्रादेशिक व्यापार आणि सहकार्याला बळकटी दिली पाहिजे, असेही स्वराज यांनी म्हटले.