पीटीआय, बारपेटा (आसाम) : अल कायदा संघटनेच्या बांग्लादेशमधील गटाशी संबंधित सहा संशयित दहशतवाद्यांना आसामच्या बारपेटा जिल्ह्यात अटक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. होव्ली शहरातील  मदरशातून या सहा संशयितांना पकडण्यात आले असून, त्यांचे ‘अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनंट’शी (भारतीय उपखंडातील अल कायदा, एक्यूआयएस) संबंध असल्याचा संशय असल्याचे पोलीस अधीक्षक अमिताव सिन्हा यांनी सांगितले. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की ४ मार्चला आम्ही एका आत्मघातकी दहशतवाद्याला (जिहादी) पकडले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार आम्ही या सहा संशयितांना अटक केली.  अटक केलेले सर्वजण बारपेटा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ‘अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनंट’चा सदस्य मोहम्मद सुमन ऊर्फ सैफुल ऊर्फ हारून रशीद याच्याशी त्यांचे संबंध होते.

 बारपेटा जिल्ह्यात ४ मार्चला एका बांग्लादेशी नागरिकासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांचे बांग्लादेशमधील संशयित दहशतवादी गट ‘अन्सरूल इस्लाम’शी संबंध असल्याची माहिती मिळाली. या गटाचे ‘अल कायदा’शी संबंध आहेत.