युट्यूबवर व्हिडिओ पाहून गरोदर असणाऱ्या आपल्या प्रेयसीचे बाळांपण करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्याचा धक्कादायक प्रकार चेन्नईमध्ये उघडकीस आला आहे. सध्या या तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर चेन्नईमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पोलिसांनी या तरुणीच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोन्नेरी गावामध्ये राहणारा २७ वर्षीय तरुण आणि कॉलेजला जाणारी १९ वर्षीय तरुणीचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. गॅस डिलेव्हरीचं काम करणारा हा तरुण आणि तरुणीचे कुटुंब एकमेकांचे शेजारीच आहेत. आठ महिन्याची गरोदर राहिलेल्या या तरुणीने मला कळा येत असून कोणत्याही क्षणी प्रसुती होईल असं आपल्या प्रियकराला सांगितलं. तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. त्याने शस्त्रक्रिया करताना वापरणारे रबराचे ग्लोव्हज आणि ब्लेड आणले. शेजारीच राहणाऱ्या मुलीच्या घरच्यांना संक्षय येऊ नये म्हणून तो या तरुणीला चेन्नईपासून काही अंतरावर असणाऱ्या काजूच्या बागांमध्ये घेऊन गेला. या तरुणाने युट्यूबवर बाळ जन्माला घालण्याचे काही व्हिडिओ पाहिले होते. त्याच व्हिडिओच्या आधारे त्याने तरुणीचे बाळांपण करण्याचा निर्णय घेतला.

मात्र युट्यूबवरील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाळाचे डोके आधी बाहेर येण्याऐवजी हात बाहेर आला. त्यामुळे अशावेळेस काय करावे यासंदर्भातील व्हिडिओ सर्च करण्याचा प्रयत्न या तरुणाने केला, मात्र त्याला व्हिडिओ सापडला नाही. त्याने बाळाचा हात ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यात बाळाचा हात तुटून त्याच्या हाताता आला. प्रेयसीच्या शरीरामधून अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ लागल्याने हा तरुण घाबरला. त्याने तरुणीला चादरीमध्ये गुंडाळून १२ किलोमीटरवर असणाऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन गेला.

तरुणीची अवस्था पाहून डॉक्टरांनाही धक्काच बसला. डॉक्टरांनी रोयापूरम येथील आरएआरएम मॅटर्निटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितले. डॉक्टरांनी अनेक तासांच्या शस्त्रक्रियेनंतर बाळाला आईच्या गर्भामधून मृतअवस्थेत बाहेर काढले.

या तरुणीच्या शरीरामधून खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची परिस्थिती चिंताजनक आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलगी आठ महिन्याची गरोदर असताना कुटुंबाच्या हे लक्षात कसं आलं नाही यासंदर्भात या दोघांच्या कुटुंबाचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.