देशातील लसीकरण कार्यक्रमात सहभागी असलेल्या दोन भारतीय लस उत्पादक कंपन्यांना चीनचा पाठिंबा असलेल्या हॅकिंग गटाने अलीकडच्या काळात लक्ष्य केल्याची माहिती ‘सायफर्मा’ या सायबर गुप्तचर कंपनीने एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भारत व चीन या दोन्ही देशांनी अनेक देशांना करोना लशीच्या मात्रांची विक्री केली आहे किंवा त्या भेट म्हणून दिल्या आहेत. जगभरात विकल्या जाणाऱ्या सर्व लशींपैकी ६० टक्क्यांहून अधिक लशींचे उत्पादन भारतात केले जाते.

‘स्टोन पांडा’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या चीनमधील ‘एपीटी १०’ या हॅकिंग गटाने भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या दोन कंपन्यांमधील माहिती तंत्रज्ञानाचे जाळे आणि पुरवठा साखळी सॉफ्टवेअर यांतील मोकळ्या जागा आणि त्रुटी शोधून काढल्या होत्या, असे सिंगापूर व टोक्योत कार्यालय असलेल्या गोल्डमॅन सॅकप्रणीत सायफर्माने म्हटले आहे.

‘या प्रकरणात खरा उद्देश बौद्धिक संपदा हिरावणे आणि भारतीय औषधनिर्माण कंपन्यांवर स्पर्धात्मक फायदा मिळवणे हा होता,’ असे पूर्वी ‘एमआय६’ या ब्रिटिश विदेशी गुप्तचर संघटनेत सायबर अधिकारी असलेले सायबरफर्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार रितेश यांनी सांगितले. एपीटी १० हा गट अनेक देशांसाठी अ‍ॅस्ट्राझेनेका लशीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूटला सक्रियरीत्या लक्ष्य करत होता, अशीही माहिती त्यांनी दिली.

‘सीरम इन्स्टिटय़ूटच्या बाबतीत, कमकुवत असे वेब सव्‍‌र्हर चालवणारे बरेच सार्वजनिक सव्‍‌र्हर त्यांनी शोधून काढले होते. हे असुरक्षित वेब सव्‍‌र्हर आहेत,’ असे रितेश यांनी हॅकर्सच्या संदर्भात सांगितले.

यावर प्रतिक्रिया विचारली असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ उत्तर दिले नाही; तर सीरम व भारत बायोटेक यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.