गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर टाटा सन्सने पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा सन्सने समूहाशी संबंधित सर्व गोपनीय माहिती आणि कागदपत्रे परत द्यावी, अशी मागणी केली आहे. समूहाची गोपनीय कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे ठेवल्याचा आरोप कंपनीने मिस्त्री यांच्यावर केला आहे. या कागदपत्रांचा गैरवापर करणार नाही, अशी लेखी हमी येत्या ४८ तासांत देण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. कोणतीही माहिती शापूरजी पालनजी समूहाला दिली जाणार नाही, असेही त्यात नमूद करण्यात यावे, असेही मिस्त्री यांना सांगितले आहे. दरम्यान, गोपनीय माहितीचा गैरवापर होण्याची भीती टाटा सन्सला असल्याचे बोलले जाते.

गोपनीय माहितीसंबंधी टाटा सन्सने सायरस मिस्त्रींना नोटीस बजावली आहे. मिस्त्री यांच्याकडे टाटा सन्सशी संबंधित माहिती असल्याचे अजूनही ग्राहकांना वाटत आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे. गोपनीय माहितीचा गैरवापर झाल्यास ग्राहकांनाही मोठे नुकसान सोसावे लागेल, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे. एका आठवड्यात मिस्त्री यांना सलग दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी टाटा सन्सने गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मिस्त्री यांना नोटीस बजावली होती.

मिस्त्री यांनी बेकायदेशीपणे समूहासंबंधीची माहिती आपल्यासोबत नेली आहे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्यांनी ही कागदपत्रे संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय आपल्याजवळ ठेवली आहेत. हे नियमांच्या विरोधात असल्याचे टाटा सन्सने म्हटले आहे. यापूर्वीही मिस्त्री यांनी आवश्यक माहिती उघड केल्याचे टाटा सन्सने म्हटले होते. दरम्यान, २४ ऑक्टोबरला सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर रतन टाटा यांना हंगामी अध्यक्षपदी नेमण्यात आले होते. त्यानंतर टाटा आणि मिस्त्री यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे.