अमेरिका आणि इंग्लंडमधील रेस्तराँपेक्षाही भारतीय रेस्तराँमध्ये खाणे खर्चिक आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण हीच वस्तुस्थिती आहे. भारतामध्ये जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये खातो तेव्हा आपण जवळपास ३१ टक्के कर भरत असतो. भारतीय रेस्तराँमध्ये लावले जाणारे कर हे अमेरिका आणि इंग्लंडपेक्षाही जास्त आहेत त्यामुळेच भारतातील एसी हॉटेलमध्ये मिळणारे जेवण हे तुलनेने खूप महाग आहे असा तुलनात्मक अभ्यास बिजनेस इनसाइडरने केला आहे.

भारतामध्ये रेस्तरॉंमधील जेवणावर १० टक्के सेवा शुल्क लागू करण्यात येते. त्याच बरोबर ५.६ टक्के सेवा कर आणि त्यावर पुन्हा सेवा शुल्क लावण्यात येत. ०.२ टक्के स्वच्छ भारत सेस आणि त्यावरील सेवा शुल्क, कृषी कल्याण सेस आणि त्यावरील सेवा शुल्क, खाद्यपदार्थांवर लावला जाणारा व्हॅट १२.५ टक्के. या सर्वांची जर बेरीज केली तर ३१.६ टक्के कर होतो. हा कर जर लावला तर जेवण महागच होते. म्हणजे जर तुम्ही एखाद्या एसी रेस्तराँमध्ये जेवणासाठी गेला आणि मेन्यू कार्डवरील किमतीनुसार तुम्ही मिळणारे पदार्थ खाल्ले त्याचे बिल १,००० रुपये झाले असेल तर सर्व प्रकारचे कर लावून तुम्हाला बिल येईल १,३१२ रुपये.

अमेरिकेमध्ये मात्र जेवणावर इतका कर लादला जात नाही. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये ठरवलेल्या करानुसार बिल लावले जाते. अमेरिकेमध्ये जेवणावर ५.६५ टक्के ते १०.७७ टक्के कर आकारला जातो. तर काही ठिकाणी १ टक्का अफॉर्डेबल केअर अॅक्ट चार्ज आकारला जातो. युनायटेड किंगडममध्ये १७.५ टक्के व्हॅट लावला जातो परंतु तो मेन्यूकार्डवर आधीच लावला गेलेला असतो. तर १२.५ टक्के हे सेवा शुल्क लावले जाते. हे सेवा शुल्क ऐच्छिक असते.

चीनमध्ये १२.५ टक्के व्हॅट लावला जातो, १० टक्के सेवा शुल्क आणि ५.०९ सेवा कर लावला जातो. फ्रान्समध्ये आधी रेस्तराँ आणि कॅफेमध्ये १९.६ टक्के कर लावला जायचा. २००९ मध्ये या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि जेवणावर केवळ ५.६ टक्के इतका कर लावला जाऊ लागला. परंतु मद्यांवर असणारा १९.६ टक्के कर बदलला गेला नाही. संयुक्त अरब अमिरातीमध्ये रेस्तराँ जर स्पेशल झोनमध्ये असेल तर १० टक्के सेवा कर आकारला जातो.

दरम्यान, भारतीय हॉटेलांमध्ये आकारले जाणारे सेवा शुल्क हे ऐच्छिक असल्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेतला होता. सरकारने याबाबत एक परिपत्रक काढले होते. या परिपत्रकाला हॉटेल व्यावसायिक संघटनांनी विरोध केला होता.