तुम्ही कानाने पाहू शकता का? याचे उत्तर नक्कीच सर्वजण नाही असे देतील, पण वैज्ञानिकांनी मात्र हा नकार होकारात बदलला आहे. त्यांनी असे क्रांतिकारी नवे उपकरण शोधून काढले आहे, ज्याच्या मदतीने अंध लोक आवाजाच्या मदतीने त्यांच्या मनात आजूबाजूच्या वस्तूची प्रतिमा तयार करू शकतील.
या नवीन संवेदनशील उपकरणाचे नाव व्हॉइस असे असून, त्यात मेंदूला आवाजाचे रूपांतर प्रतिमांमध्ये करण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्याचा वापर अंध व अंशत: दृष्टी असलेल्या रुग्णांसाठी केला जाऊ शकतो.
इंग्लंडमधील बाथ विद्यापीठातील डॉ. मायकेल प्रॉलक्स यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ज्यांच्या डोळय़ांवर पट्टी बांधली आहे, अशी दृष्टी असलेले लोक या उपकरणाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या डोळय़ांच्या चाचणीला कसा प्रतिसाद देतात याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांना प्रमाणित आय चार्ट टेस्टला सामोरे जाण्यास सांगण्यात आले, या चाचणीला ‘स्नेलन टंबलिंग इ टेस्ट’ असे म्हटले जाते. त्यात संबंधित व्यक्तीला ‘इ’ हे इंग्रजी अक्षर चार वेगवेगळय़ा दिशांना फिरवलेल्या अवस्थेत वेगवेगळय़ा आकारात दाखवले जाते. २०/२० या मापनास तुमची दृष्टी योग्य असल्याचे मानले जाते. यात डोळय़ांवर पट्टी बांधलेल्या व्यक्तींनी ही चाचणी हे उपकरण वापरून चांगल्या पद्धतीने पार केली. मूलपेशी प्रत्यारोपण व रेटिनल प्रॉस्थेसिस या आधुनिक तंत्रापेक्षाही यात दृष्टी चांगली सुधारल्याचे दिसून आले. ही यशस्वी दृष्टी पातळी २०/४०० होती. मूलपेशींच्या वापराने ती २०/८०० इतकी वाढवता येते, असे प्रोलक्स यांचे मत आहे. त्यांच्या मते संवेदनशील पर्यायी उपकरणांचा वापर हा इतर तंत्रासमवेत केला तर मेंदूत संबंधित वस्तूंची प्रतिमा तयार करता येते. फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधन पथकात व्हॉइस या संवेदन उपकरणाचे निर्माते डॉ. पीटर मेजर, अ‍ॅलेस्टर हाय, डेव्ह ब्राऊन यांचा समावेश होता.