scorecardresearch

तब्बल १८०० कोटी रुपये खर्च करून ऐतिहासिक मंदिराची पुनर्बांधणी; मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या मंदिराचे आज लोकार्पण

मंदिराच्या गोपुरममध्ये १२५ किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

आज २८ मार्च सोमवार रोजी देशात एका ऐतिहासिक मंदिराचे उद्घाटन होत आहे. पुनर्बांधणीनंतर हे मंदिर पुन्हा खुले करण्यात येणार आहे. या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल १८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तेलंगणातील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी आणि यज्ञ केले जात आहेत. सीएम के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. हे मंदिर खुलं करण्याचे मुहूर्त मुख्यमंत्री केसीआर यांचे आध्यात्मिक गुरू चिन्ना जेयार स्वामी यांनी काढले आहे.

मंदिर पुन्हा उघडण्यापूर्वी ‘महा सुदर्शन यज्ञ’ देखील केला जात आहे, ज्यासाठी शंभर एकर यज्ञ वाटिका बांधण्यात आली असून त्यात १०४८ यज्ञकुंडले आहेत. या विधीत हजारो पंडित त्यांच्या सहाय्यकांसह सहभागी होणार आहेत. यादद्रीचे हे श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हैदराबादपासून ८० किमी अंतरावर आहे. हे मंदिर साडेचौदा एकरमध्ये पसरले असून २०१६ मध्ये त्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली. तर हा मंदिर टाउनशिप प्रॉजेक्ट २५०० एकरमध्ये पसरलेला आहे.

या विशाल आणि भव्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिराच्या पुनर्बांधणीत २.५ लाख टन ग्रॅनाइट वापरण्यात आले आहे. हे ग्रॅनाइट आंध्र प्रदेशातील प्रकाशम येथून आणण्यात आले. तर मंदिराचे प्रवेशद्वार पितळेचे असून त्यात सोन्याचा मुलामा बसवल्याचं वृत्त झी न्यूजने दिलंय.

मंदिराच्या गोपुरममध्ये १२५ किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री केसीआरसह अनेक मंत्र्यांनी सोने दान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केसीआर यांच्या कुटुंबीयांनी सुमारे दीड किलो सोने दान केलंय आहे. या मंदिराची रचना प्रसिद्ध फिल्म सेट डिझायनर आनंद साई यांनी तयार केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Telangana cm performs puja at newly renovated yadadri temple everything about the architectural masterpiece hrc

ताज्या बातम्या