आंध्र प्रदेशचे विभाजन करण्याच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्रिगटाने बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय तेलुगू देसम पक्षाने घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या संबंधित गटामध्ये गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी, अर्थमंत्री पी. चिदम्बरम् आणि इतरांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीसंबंधी राज्यातील आठ विविध राजकीय पक्षांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्याच्या विविध प्रांतांमधील सर्व संबंधितांना पाचारण करून त्यांना भेडसावणाऱ्या मुद्दय़ांवर मंत्रिगटाने चर्चा करावी, अशी आमची मुख्य मागणी आहे, असे तेलुगू देसमचे ज्येष्ठ नेते गली मुद्दुकृष्णम्मा नायडू यांनी येथे सांगितले. या बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा पंतप्रधानांना पत्राद्वारे आपल्या पक्षाची भूमिका सांगण्याचेही  पक्षाच्या बैठकीमध्ये ठरले.