‘ईद उल अझा’ अर्थात बकरी ईदच्या दिवशी ‘हलाल’ केल्या जाणाऱ्या प्राण्यांची कातडी जमवून त्याच्या विक्रीतून पाकिस्तानातील कट्टर इस्लामी संघटनांनी तब्बल ७८ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती उघड झाली आहे. जमात उद दावा, जैश ए मोहम्मद अशा दहशतवादी कारवायांत सामील असलेल्या संघटनांवर अशा प्रकारे कातडी जमवण्यास बंदी असतानाही हा व्यवहार उघडपणे सुरू असल्याचे वृत्त ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.
पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, जमात उद दावा व त्यांची सहकारी संघटना फलह ए इन्सानियत फाउंडेशन, जैश ए मोहम्मद व त्यांची सहकारी संघटना अल रेहमत ट्रस्ट, सिपाह ए साहब पाकिस्तान, तेहरिक ए जाफरिया पाकिस्तान, शिया उलेमा कौन्सिल, सुन्नी तेहरिक, हरकत उल मुजाहिदीन आणि अल बदर मुजाहिदीन या बंदी घालण्यात आलेल्या संघटनांनी ईद उल अझाच्या दिवशी कुर्बानी दिल्या जाणाऱ्या प्राण्यांची कातडी जमवली व त्यांच्या विक्रीतून सुमारे ७८ कोटी २ लाख रुपये मिळवले. या सणाच्या दिवशी कुर्बानी केल्या जाणाऱ्या प्राण्यांची कातडी एखाद्या मशीद अथवा मदरशाला देऊन त्यांना त्याच्या विक्रीतून निधी मिळावा, असा सर्वसामान्य प्रघात आहे. मात्र, प्रत्यक्षात या कट्टर संघटना या पैशांचा वापर घातपाती कारवायांसाठी करत असावेत, असा अंदाज आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रातांच्या सरकारने ११ व १५ ऑक्टोबर रोजी आदेश जारी करून बंदी घालण्यात आलेल्या तसेच कट्टर संघटनांना कातडी जमवण्यास मनाई केली होती. यासंदर्भात पोलीस व स्थानिक प्रशासनाने काटेकोर लक्ष देण्याचेही आदेश देण्यात आले होते. मात्र, या संघटनांच्या सदस्यांकडून कातडी जमवण्याचे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाच धमक्या देण्यात आल्याचे ‘डॉन’ने वृत्तात म्हटले आहे.    
हल्ल्यात आठ ठार
पाकिस्तानमधील तणावग्रस्त असलेल्या पश्चिमोत्तर भागातील एका पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात आठ जण ठार झाले. मृतांमध्ये चार पोलिसांचाही समावेश आहे. तर दुसऱ्या एका हल्ल्यात आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.
 पश्चिमोत्तर भागातील खैबर-पख्तूनवा प्रांतात पोलीस आणि काही नागरिक पोलीस ठाण्याच्या आवारातील मशिदीत प्रार्थना करीत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रतिकार केल्यानंतर दहशतवाद्यांनी ग्रॅनेडने हल्ला केला. जवळजवळ एक तास ही धुमश्चक्री सुरू होती,
तेहरीक-ए- तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला  इब्राहीम मसूदच्या हत्येचा निषेध असल्याचे संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.