थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ११ ते १६ वयोगटातली १२ मुलं थांम लुआंग नांग नोन गुहेत अडकली आहेत. पुढील काही तासांत या मुलांना गुहेबाहेर काढण्याचं मोठं आव्हान सिल कमांडोसमोर असणार आहे. पण बाहेर येण्याचा प्रवास नक्कीच सोपा नसणार आहे. अनेक संकटं या मुलांच्या मार्गात आहेत. हे अडथळे पार करून या लहान मुलांना बाहेर पडायचं आहे.

पोहोण्याचं आव्हान
ही मुलं गुहेत चालत गेली असली तरी सध्याची परिस्थिती खूपच वेगळी आहे. मुसळधार पावसामुळे गुहेतील खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुलांना पोहून ही गुहा पार करायची आहे. पोहोण्यात पारंगत असलेल्या एका पाणबुड्यालाही ही गुहा पार करण्यासाठी सहा तासांहून अधिकचा अवधी लागला. दुर्दैवानं एकाही मुलाला पोहोता येत नाही. या मुलांना गेल्या आठवड्याभरापासून पोहोण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मात्र सर्वात कठीण गुहा पार करण्यासाठी हे प्रशिक्षण पुरेसं नाही. त्याचप्रमाणे हा प्रवास जास्त असल्यानं मुलांपुढे न थकता तो पार करण्याचं मोठ आव्हान असणार आहे.

पाऊस
सर्वात मोठा धोका हा अतिवृष्टीचा आहे. हवामान खात्यानं या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस आला तर गुहेतील पाण्याची पातळी वाढू शकेल. त्यामुळे निर्सगाचं मोठं आव्हान या मुलांसमोर आहे.

चिखल
ही मुलं पोहून गुहा पार करणार असली तरी गढुळ पाण्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गढुळ पाण्यामुळे मार्ग शोधण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे चिखल असाच वाढत गेला तर दृश्यमानता कमी होऊ मुलांना वाट शोधण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

ऑक्सिजनची कमी
या मोहिमेत सहभागी झालेल्या एका माजी कमांडोचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला होता. गुहेत ऑक्सिजनची कमी आहे. जरी ऑक्सिजन सिलेंडर सोबत असले तरी मोठा धोका अजूनही कायम आहे.

शारिरीक दृष्ट्या जोखीम
ही मुलं गेल्या १५ दिवसांपासून गुहेत अडकली आहे, सुरूवातीचे ९ दिवस अन्नावाचून ही मुलं राहिली त्यामुळे शारिरीकदृष्ट्या ती अशक्त होती. त्यानंतर अन्न, औषधं त्यांना पुरवण्यात आलं. मात्र ही कठीण गुहा पार करण्यासाठी ही मुलं खूपच लहान आहेत. तसेच हा खडतर प्रवास पार करण्यासाठी त्यांना मानसिक दृष्ट्याही तितकंच खंबीर असावं लागणार आहे.