थायलंडमध्ये विरोधकांच्या मेळाव्यावर पोलिसांनी केलेल्या  एका पोलिसासह तीन ठार झाले, तर इतर ५९ जण जखमी झाले. थायलंडमध्ये पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्या उचलबांगडीसाठी निदर्शने करण्यात येत आहेत. पोलिसांनी निदर्शनाचे ठिकाण असलेला फान फा पूल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी १०० निदर्शकांना अटक करण्यात आली.
सरकारी मालकीच्या तेल व वायू कंपनीच्या समोरच हा प्रकार घडला. जानेवारीत देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या निदर्शकांना पकडण्यात आले.
 पोलिसांनी ‘पीस फॉर बँकॉक’ मोहीम सुरू केली तेव्हा बॉम्ब व गोळीबाराचे आवाज आले. पोलीस व निदर्शक यांच्यातील चकमकीत दोन नागरिक व पोलिस असे तीन जण ठार झाले असे शहरातील एरवान आपत्कालीन वैद्यकीय उपचार केंद्राने सांगितले. विशेष चौकशी विभागाचे प्रमुख तरित पेंडिथ यांनी सांगितले की, एका पोलिसाच्या डोक्याला गोळी लागली तर इतर १७ पोलीस जखमी झाले. काही अधिकारी हातबॉम्ब हल्ले व गोळीबारात जखमी झाले.
जखमींमध्ये एका परदेशी पत्रकाराचा समावेश आहे. सेंटर फॉर मेंटेनिंग पीस अँड ऑर्डर या संस्थेने म्हटले आहे की, निदर्शकांनी ताब्यात घेतलेली पाच ठिकाणे परत मिळवणे हा आमचा उद्देश आहे, त्यात गव्हर्नमेंट हाऊस, पंतप्रधान कार्यालय यांचा समावेश आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म कमिटीच्या निदर्शकांनी या भागांचा ताबा घेतला आहे. कामगार मंत्री शालेर्म यूबामरूंग यांनी सांगितले की, पंतप्रधान यिंगलक यांनी हिंसाचाराला थारा न देण्याचे आदेश दिले आहेत.  विरोधकांना डेमोक्रॅटिक पक्षाचा पाठिंबा असून क्षीमती यिंगलक यांना पदावरून हाकलण्यासाठी नोव्हेंबरपासून बँकॉकमध्ये निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, थायलंडच्या लाचलुचपत विरोधी मंडळाने शिनावात्रा यांच्यावर वादग्रस्त तांदूळ अनुदान योजनेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवण्याचे सूचित केले आहे.