देशातील करोनाची स्थिती निश्चित कशी आहे हे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने निर्णायक ठरणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी येथे सांगितले. आगामी उत्सवांचा काळ आणि हिवाळ्यात जनतेने कोविड-१९ बाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा कमी

देशातील कोविड-१९च्या सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा कमी असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ९७.२ दिवसांवर गेले आहे, असेही ते म्हणाले. हर्षवर्धन यांनी उत्तर प्रदेशचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कोविड-१९शी मुकाबला करण्याच्या सज्जतेचा आढावा घेतला.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर

गेल्या तीन महिन्यांत देशातील करोनाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, दररोज ९५ हजार करोनाबाधित आढळत होते ती संख्या आता प्रतिदिन ५५ हजारांवर आली आहे. देशात करोनामुक्तांचे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले आहे. मृत्यू प्रमाणही १.५१ टक्क्यांवर आले आहे आणि हे प्रमाण एक टक्क्याहून कमी होण्याच्या दिशेने जात आहे. देशातील करोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या  दोन हजारांपर्यंत पोहोचली आहे आणि चाचण्यांनी १० कोटींचा टप्पाही ओलांडला आहे. आपण योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे हे संकेत आहेत, असेही ते म्हणाले.