पीटीआय, नवी दिल्ली

राजधानी दिल्लीचे तापमान बुधवारी ५२.३ अंशांवर पोहोचले असून हा आजवरचा उच्चांक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी दुपारच्या वेळेत घरातच राहणे पसंत केल्याने रस्त्यांवर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळाला. वाढत्या तापमानामुळे विजेची मागणीही ८ हजार मेगावॉटपेक्षा अधिक झाली आहे. राजस्थानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीचे तापमान वाढल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

मंगळवारी दुपारी दिल्लीचे तापमान ४९.९ अंशांवर जाऊन पोहोचले होते. बुधवारी दुपारी ४.१४ वाजता तापमापकाचा पारा ५२.३ अंशांवर जाऊन पोहोचला आणि राजधानीने तापमानाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. शहराच्या मध्यभागांपेक्षा सीमांवरील तापमान काहीसे अधिक नोंदविले गेले. राजस्थानातील वाळवंटावरून अतिशय उष्ण वारे दिल्लीकडे येत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भविल्याचे हवामान विभागाचे क्षेत्रीय प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. उष्ण वाऱ्यांचा प्रभाव मुंगेशपूर, नरेला आणि नजाफगंज यांसारख्या भागांवर आधी होतो. त्यामुळे आधीच वाढलेल्या तापमानात आणखी भर पडल्याचे ते म्हणाले. मोकळय़ा भूखंडांवर वाऱ्यांचा प्रभाव अधिक असतो. थेट सूर्यप्रकाश आणि सावली नसल्याने तापमानात मोठी वाढ होते. पश्चिमेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर असे भाग प्रभावित होतात, असे ‘स्कायमेट’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक भाजून काढणाऱ्या उकाडय़ामुळे हैराण झाले आहेत. ‘‘आम्ही दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे संपूर्ण टाळतो,’’ असे नजाफगंजचे रहिवासी  अमित कुमार यांनी सांगितले. ‘‘उष्ण वाऱ्यांमुळे त्वचा भाजून निघत असल्याचा अनुभव येत आहे. याचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. एक-दोन, फार तर तीन दिवस तुम्ही घरात कोंडून घेऊ शकता. पण रोजच्या कामासाठी तुम्हाला बाहेर पडावेच लागते. अशा वेळी खूप त्रास होतो,’’ असा अनुभव मुंगेशपूरचे रहिवासी जय पंडित यांनी सांगितला.

हेही वाचा >>>दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी, ताप १०७ डिग्रींवर जाऊन रुग्णाचा मृत्यू

दरम्यान, तापमानात वाढ होत असताना बुधवारी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटे आणि ३२ सेकंदांना विजेची मागणी ८,३०२ मेगावॉटवर गेली होती. राजधानीत विजेची मागणी ८,३०० मेगावॉटपेक्षा अधिक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ‘पॉवर डिस्कॉम’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे ८,२०० मेगावॉटपर्यंत मागणी जाईल, अशी वीज कंपन्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त मागणी असल्याने यंत्रणेवर मोठा ताण पडला.

विदर्भ तापलेलाच

उत्तरेतील उष्णतेच्या लाटांमुळे विदर्भात पारा सरासरी ४२ अंशांवर गेला आहे. राज्यात बुधवारी चंद्रपुरातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४६.७ अंश तापमानाची नोंद झाली. याखेरीज अकोला ४२.६, अमरावती ४३.८, भंडारा, वर्धा ४५.०, चंद्रपूर ४४.२, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ ४४.०, नागपूर ४५.२ आणि वाशिममध्ये पारा ४२.६ अंशांवर होता. मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर ४०.०, बीड ४१.७, नांदेड ४२.८ आणि परभणीत ४२.० अंश तापमान होते. उत्तर महाराष्ट्रात जळगावात ४२.०, मालेगाव ४१.८ अंशांवर होते. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत पारा चाळिशीच्या आत होता. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये दमटयुक्त उष्णतेचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा >>>Sensor Error : दिल्लीत ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, पण IMD म्हणतं, “स्थानिक घटकातील त्रुटीमुळे…”

५० अंश सेल्सिअसवर धोका काय?

मानवी शरीरासाठी ३७ अंश सेल्सिअस हे तापमान सर्वात योग्य आहे. या तापमानात सर्व अवयव पूर्ण क्षमतेने काम करतात. तापमान ४० ते ५० अंशांच्या दरम्यान असेल, तर त्याचा परिणाम महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर होतो. शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी उष्णता बाहेर टाकणे आवश्यक असते. वातावरण उष्ण असेल, तर यात अडचणी येतात. त्यामुळे हृदय, किडनी यांसारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवांवर ताण येतो. यामुळे काही वेळा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते किंवा प्रसंगी उष्माघाताने मृत्यूही होण्याचा धोका असतो.

बिहारमध्ये विद्यार्थी बेशुद्ध

संपूर्ण उत्तर भारतातच उष्णतेची लाट असून बुधवारी बिहारचे तापमान ४७.७ अंशांवर जाऊन पोहोचले. औरंगाबाद, बेगुसराय आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील अनेक शाळांतील मुलांना उष्णतेचा त्रास झाला. शुद्ध हरपणे, उलटय़ा असे प्रकार झाल्याने काही जणांना रुग्णालयांत दाखल करावे लागले. त्यानंतर राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना ८ जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.