पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांना विविध मुद्य्यांवर संबोधित केले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने खादी वापरचा मुद्दा उपस्थित करत, खादीचा वापर वाढवून खादी ग्रामउद्योगास बळकटी देण्यास हातभार लावण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे.

याशिवाय, आगामी सणांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादनेच एकमेकांना भेट म्हणून द्या, असे देखील म्हटले आहे. तर, आम्ही खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशनमध्ये खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा संकल्प जोडला असल्याचेही सांगितले. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“खादी फॉर नेशन’ पण राष्ट्रध्वजासाठी चिनी पॉलिस्टर! नेहमीप्रमाणे पंतप्रधानांचे शब्द आणि कृती कधीच जुळत नाही.” असं ट्वीट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

जाणून घ्या, पंतप्रधान मोदी काय म्हणाले? –

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “स्वातंत्र चळवळीच्या वेळी ज्या खादीला महात्मा गांधींनी देशाचा स्वाभिमान बनवलं होतं. तीच खादी स्वातंत्र्यानंतर न्यूनगंडाच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे. ज्यामुळे खादी आणि खादीशी निगडीत ग्रामोद्योग पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. खादीची ही अवस्था विशेषतः गुजरातसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. आम्ही खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशनमध्ये खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा संकल्प जोडला. गुजरातमधील यशाचे अनुभव आम्ही देशभर पसरवायला सुरुवात केली. देशभरातील खादीशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. आम्ही देशवासीयांना खादी उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित केले.”

खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात महिला शक्तीचाही मोठा वाटा –

तसेच, “भारताच्या खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात महिला शक्तीचाही मोठा वाटा आहे. आपल्या भगिनी आणि मुलींमध्ये उद्योजकतेची भावना रुजलेली आहे. गुजरातमधील सखी मंडळांचा विस्तार हाही याचा पुरावा आहे. खादी हे टिकाऊ कपड्यांचे उदाहरण आहे. खादी हे पर्यावरणपूरक कपड्यांचे उदाहरण आहे. खादीमध्ये सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट आहे. असे अनेक देश आहेत जिथे तापमान जास्त आहे, खादी देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर खादी मोठी भूमिका बजावू शकते.” असंही मोदींनी सांगितले.

देशभरातली जनतेला आवाहन –

याचबरोबर, “मला देशातील जनतेला एक आवाहनही करायचे आहे. आगामी सणांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादनेच एकमेकांना भेट म्हणून द्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असू शकतात. पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास व्होकल फॉर लोकल मोहिमेला गती मिळेल.” असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.