लहान मुलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश परिसरातील सत्यार्थींच्या निवासस्थानी ही घटना घडली. कैलाश सत्यार्थी सध्या काही कामानिमित्त अमेरिकेत आहेत. हीच वेळ साधून चोरट्यांना काल रात्री त्यांच्या घरावर डल्ला मारल्याची माहिती मिळत आहे. चोरट्यांनी कैलाश सत्यार्थी यांच्या घरातील अनेक वस्तू लंपास केल्या. यामध्ये सत्यार्थी यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याठिकाणी चोरांच्या हातापायांचे ठसे शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. यापूर्वी २००४ मध्ये रविंद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये मिळालेले साहित्याचे नोबेल पारितोषिकही चोरीला गेले होते.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसूफजाई यांना २०१४ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. भारतात लहान मुलांना मुक्तपणे जगू दिले जात नाही. जगण्याच्या लढाईत नकळत्या वयात त्यांना जुंपले जाते आणि शाळेच्या दप्तराऐवजी घर चालविण्याचे ओझे त्यांच्या चिमुकल्या खांद्यावर देऊन त्यांना कामाला जुंपले जाते. या विरोधात कैलाश सत्यर्थी गेली सुमारे तीन दशके प्रखर लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘बचपन बचाओ आंदोलन’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. गांधीजींचा वारसा जपत त्यांनी विविध लोकशाही आयुधे वापरत आपली चळवळ पुढे नेली आहे. नोबेल पुरस्कार समितीने या बाबीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.

दिल्लीतील चोरीच्या वाढत्या घटना कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या लोधी इस्टेट येथील घरातून महात्मा गांधींजींचा चष्मा मौल्यवान चष्मा आणि इतर वस्तू चोरीला गेल्या होत्या. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या ल्यूटन्स झोनमध्ये घराबाहेरील नावाच्या पितळी पाट्या चोरणाऱ्यांनी धुमाकूळ घातला होता. या भागातील बड्या लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरावरील पाट्या गायब झाल्याने पोलीस हैराण झाले आहेत. १ जानेवारीपासून या चोरट्यांनी लोधी इस्टेट येथील दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांच्या घराबाहेरील पितळी पाट्या चोरल्याच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या जिल्हा पोलिसांनी या चोरट्यांना शोधण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खास पथके तैनात केली होती. मात्र, तरीदेखील गुरूवारी या चोरट्यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांच्या घरावर डल्ला मारला. पिंकी आनंद यांच्या घरात चोरी होण्याची ही दुसरी वेळ असून यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील एलईडी टीव्ही, अनेक नळ आणि महागडे सूट चोरून नेले होते. पोलिसांनी या घटनांना दुजोरा दिला असून या चोऱ्यांचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिंकी आनंद यांच्या घरातील दरोड्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण आणखी गांभीर्याने घेतले आहे. आनंद यांच्या घरातील नोकराने दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बंगल्याची भिंत ओलांडून आतमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी पुढच्या दरवाजाचे लॉक तोडले. त्यानंतर त्यांनी तीन खोल्यांच्या काचा फोडल्या व त्यांनी घरातील एलईडी टीव्ही सेट, नळ, शॉवर आणि उंची सूट घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर पिंकी आनंद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागात अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राहत असल्याने दिल्ली पोलिसांनी त्वरीत पावले उचलावीत, असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आता चोरट्यांना शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते.