उरीतील हल्ल्यानंतर भारतीय जवानाने कवितेच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिले आहे. सिंह कोणालाही घाबरत नाही, आम्हाला बॉम्ब आणि गोळ्यांची माहिती भीती नाही, आम्हाला भीती वाटते ती ताश्कंद किंवा शिमला सामंजस्य कराराची असे सडेतोड उत्तर या कवितेतून देण्यात आले असून भारतीय जवानाचा कविता गातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे. या हल्ल्यानंतर भारतीय जवानाने पाकिस्तानला उत्तर देणा-या कवितेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्यातील एक जवान त्यांच्या सहका-यांसोबत प्रवास करताना दिसत आहे. तुम्ही सिंहाचे बछडे नाहीत. तुम्ही भारताचा इतिहास विसरला आहात. तुम्ही अणूबॉम्ब तयार केले. पण भारताविरुद्ध झालेले युद्ध विसरु नका असे या कवितेत म्हटले आहे. आता युद्ध छेडले तर तुमचा अस्तित्व राहणार नाही, काश्मीर तर असेल पण पाकिस्तान नसेल असा इशाराच या कवितेतून दिला आहे. इतिहासच काय तुमचा भूगोलच बदलून टाकू अशी तंबीही या जवानाने कवितेतून दिली आहे. आज संपूर्ण देश जर तुमच्या विरोधात उभा राहिला तर तुमच काय होईल याची तुम्हाला जाणीव नाही. तुमचा हस्तक्षेप खूप झाला, आता अजून काही झाल्यास संपूर्ण देशाला याचे परिणाम भोगावे लागतील असे या जवानाने म्हटले आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ तुफान गाजत असून अनेक राजकीय नेतेमंडळीही हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.